MNS Against CM Shinde: मनसे वाढवणार सीएम एकनाथ शिंदेंची डोकेदुखी; राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष

ठाणे – मंगळवारी (दि. 15) निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. सर्व पक्ष उमेदवारांची नावे अंतिम करण्यात गुंतले आहेत. अशातच मनसे पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढवणार असल्याचे दिसत आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मनसे आपला उमेदवार उभा करणार असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर मनसेने तयारी देखील केली असल्याची माहिती आहे. मात्र यावर अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरे घेणार आहेत. ( Maharashtra Assembly elections 2024)
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मनसेने ठाण्यातून निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अभिजीत पानसे यांना मैदानात उतरवण्यात येणार आहे. ठाणे शहर मतदार संघात भाजपच्या संजय केळकर, ओवळा माजिवडा मतदार संघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक आणि कळवा मुंब्रा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मनसे निवडणूक लढवणार आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहेत. पण, स्थानिक पातळीवर चारही जागा लढण्याची तयारी मनसेच्या नेत्यांनी दाखवली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अभिजित पानसे, संजय केळकर यांच्या विरोधात अविनाश जाधव, प्रताप सरनाईकांविरोधात संदीप पाचंगे, आणि जितेंद्र आव्हाडांविरोधात सुशांत सूर्यराव हे निवडणुक लढणार असल्याची चर्चा सुरु आहे.
लोकसभेत मनसेचा महायुतीला पाठिंबा –
एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेऊन भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. काही ठराविक उमेदवारांसाठी सभाही घेतल्या होत्या. त्यामध्ये, ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठीही जाहीर सभा घेत निवडून देण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिक व मतदारांना केलं होतं.
मनसेचा एकला चलो रे चा नारा –
लोकसभेत महायुतीला पाठिंबा दिलेल्या मनसे पक्षाने विधानसभा निवडणुकांमध्ये एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. गेल्या महिन्यात राज ठाकरेंनी मराठवाडा आणि विदर्भ दौराही केला आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून पहिला उमेदवार जाहीर केला होता. एकापाठोपाठ एक असे एकूण 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मनसेने एकानाथ शिंदे यांच्याविरूद्ध उमेदवार दिल्यास शिंदे यांना फटका बसू शकतो त्यांची डोकेदुखी वाढू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष हिंदूत्वाचा पुरस्कार करतात. त्यामुळे हिंदू मते दोघांमध्ये विभागल्यास शिंदे यांना फटका बसू शकतो.





