निवडणुका लढवण्यासाठीची किमान वयोमर्यादा कमी करावी ! 25 ऐवजी 18 वर्षे वयाचा विचार व्हावा

नवी दिल्ली -लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठीची किमान वयोमर्यादा कमी करावी. त्यासंदर्भात 25 ऐवजी 18 वर्षे वयाचा विचार व्हावा, अशी शिफारस कायदा आणि कार्मिक विषयक संसदीय स्थायी समितीने केली आहे.
भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने तरूणांना अधिकाधिक संधी देण्यासाठी संबंधित शिफारस केली आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमधील व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून तरूण विश्वासार्ह आणि जबाबदार राजकीय भागीदार बनू शकतात असे दिसून आले. त्यामुळे भारतात निवडणुका लढवण्यासाठीचे वय कमी करण्यात यावे असे आम्हाला वाटते.
उमेदवारीसाठीचे वय घटवल्याने तरूणांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची समान संधी मिळेल, असे त्या समितीने नमूद केले आहे. सध्याच्या नियमांनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठीची किमान वयोमर्यादा 25 वर्षे इतकी आहे. तर, राज्यसभा आणि विधान परिषद सदस्य बनण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे आहे. मतदार बनण्यासाठीची वयोमर्यादा 18 वर्षे आहे.





