Satara | गौरी गणपतीच्या सजावट साहित्याने बाजारपेठ सजली

सातारा, (प्रतिनिधी) – गौरी-गणपती उत्सव जेमतेम १५ दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे, सातारा शहरातील बाजारपेठ गणेश मूर्ती व गौरी मुखवटे तसेच सजावट साहित्यांच्या स्टॉल्सने सजली आहे.
मात्र, यंदा गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यांच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे श्रीच्या उत्सवाला सध्या महागाईची झळ जाणवत आहे.
बाजारपेठेतील बहुतेक स्टॉल्सवर विक्रीसाठी गणेश मूर्तीं विक्रीसाठी पेण, नगर, उरुळी कांचन नायगाव तसेच मावळ तालुक्यातील ( पुणे ) तळेगाव, खालुंब्रे येथून आणल्या जातात.
याशिवाय, गणेश भक्तांच्या आवडीनुसार सुंदर, सुबक, आकर्षक व नाविन्यता असलेल्या मूर्ती बनविल्या जातात. साताऱ्यात सरासरी ५० हजारपेक्षा जास्त गणेश मूर्तींची विक्री होते.
कच्चा माल, रंग, मजुरी व वाहतूक खर्चात सुमारे १५ ते २० टक्के वाढ झाल्याने गणेश मूर्तींच्या किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक ते दीड फूट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तीच्या किमती १५०० ते ३५०० रुपये; तर सार्वजनिक गणेश मूर्तींच्या किमती ४ ते ८ फूट उंचीच्या ८ हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहेत, असे विक्रेते राजेश शिंदे, गोरख सावंत व सुशांत पानसरे यांनी सांगितले.
साताऱ्यात मोती चौक ते पंचमुखी गणेश मंदिर परिसरातील विविध स्टॉल्सव आकर्षक रत्नजडित खड्यांची सजावट केलेल्या (डायमंड वर्क) दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजापाठोपाठ टिटवाळा, पेशवा, सिध्दी सिध्दी गणेश मूर्तींना अधिक पसंती असल्याचे स्टॉलधारक पंकज जगताप ओंकार घोरपडे यांनी सांगितले.
याशिवाय श्री उपरणे , चांदीचे मोदक, दूर्वा, कंबरपट्टा, मूषक, चंदनहार, डायमंड नेकलेस सराफ बाजरात उपलब्ध आहेत .याशिवाय सजावटीचे पर्यावरण पूरक मखर साहित्य एक हजार रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.
सातारा पॅटर्न खळी, चंद्रकोर असलेले विविध आकारांचे गौरी मुखवटे (जोडी) किमत ८०० ते ३ हजार ५०० रुपये; तर गौरीची फायबर बॉडी (जोडी) ११ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहे. मूर्तींप्रमाणेच सजावट साहित्य किंमती ही १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.-आबासाहेब चव्हाण मूर्ती विक्रेते
शाडू मातीच्या मूर्तींच्या किमती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा दीडपट अधिक असल्या तरी भाविक शाडूच्या मूर्तींना अधिक पसंती देत आहेत. आवडीची मूर्ती मिळावी म्हणून भाविकांची बुकिंग करण्याची लगबग चालू आहे. -विनोद शिंदे, गणेश मूर्ती विक्रेते





