भाषेचा वाद पुन्हा चिघळला.! ‘तिसरी भाषा’ म्हणून भारतीय भाषांचा पर्याय; फडणवीसांच्या विधानाने खळबळ

Devndra Fadnavis – हिंदी आधी अनिवार्य होती, पण आता ती अनिवार्यता काढून टाकली आहे. आता मुलांना कुठलीही तिसरी भारतीय भाषा शिकता येईल. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा अनिवार्य आहे. त्यासोबत इतर दोन भाषांपैकी एक भारतीय भाषा असावी.
आपल्याकडे इंग्रजी सहज स्वीकारली जाते. त्यामुळे हिंदी भाषेचा पर्याय दिला होता, कारण हिंदीचे शिक्षक उपलब्ध आहेत. पण हिंदीची सक्ती नाही. कोणतीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून निवडता येवू शकेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेवरुन मनसेने नेहमीच आक्रमक भूमीका घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत महाराष्ट्रात आपण पहिलीपासूनच्या अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा समावेश करत आहोत, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
परंतु याबाबत मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत, असा थेट हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. गुजरातसह इतर राज्यांमध्ये हिंदीची सक्ती नसताना महाराष्ट्रात तुम्ही ही सक्ती का करत आहात?
सुसंस्कृती महाराष्ट्र काबीज करण्यासाठी उत्तरेतील नेत्यांचा या डाव आहे. तसेच काही आयएएस अधिकारी त्यांना इथे आल्यावर मराठी भाषा शिकायला लागू नये म्हणून या निर्णय लादत आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केला होता.
राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “नव्या शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचेल. मराठी भाषा अनिवार्यच असणार आहे. हिंदी भाषेला एक पर्याय असेल. या संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे.
त्यांना असे वाटते की, दोनच भाषा असाव्यात. पण देशात त्रिभाषीक सूत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र द्विभाषा सूत्रावर जाऊ शकत नाही. आपली भाषा शिकत असताना एखादी भारतीय भाषा शिकली तर त्यात गैर काय?
आपल्या भाषेला डावलले गेलेले नाही. मुले नवी भाषा शिकतील तर अधिक ज्ञान मिळवतील. राज यांचा आग्रह असला तरीही देशभरातील जाणकारांनी शैक्षणिक धोरण तयार केलेले आहे, असेही फडणवीसांनी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेचा अभ्यासक्रमात समावेश आम्ही होऊ देणार नाही, सरकारला हे चॅलेंज म्हणून घ्यायचे असेल तर त्यांनी ते तसे घ्यावे, असं आव्हान राज ठाकरेंनी दिले आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार विरुद्ध राज ठाकरेंची मनसे असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.





