मजूर म्हणू लागले… ‘महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’

विश्रांतवाडीतून पुणे पोलिसांच्या मदतीने परप्रांतीय मध्य प्रदेशला रवाना
येरवडा – केंद्र सरकारने लॉकडाऊनचा तिसरा टप्पा घोषित केल्यानंतर परप्रांतीय कामगारांचा धीर सुटला. राज्यासह पुण्यातूनही परप्रांतीयांचे तांडे त्याच्या मूळ गावी निघाले असता त्यांच्या मदतीकरता पोलीस सरसावले.
मुंबई, नाशिक येथे पोलिसांच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहणारे हेच पोलीस पुण्यात “महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’च्या घोषणा देताना दिसून आले. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलीस करीत असलेल्या मदतीमुळे हे परप्रांतीय मजूर आता अक्षरश: भारावून गेले आहेत.
पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. यानुसार विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथून अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत मध्य प्रदेश या ठिकाणी बुधवारी (दि.13) मुजरांना घेऊन सात बसेस रवाना झाल्या. तत्पूर्वी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन याठिकाणी डॉ. वाडेकर यांच्या मदतीने परप्रांतीय मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
या बस रवाना होताना मजुरांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी “महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, गुन्हे निरीक्षक रवींद्र कदम, राज्य परिवहन मंडळाचे शिवाजीनगर आगारप्रमुख सुनील भिसे, सामाजिक कार्यकर्ते सुहास टिंगरे उपस्थित होते.
पुणे शहरात दीड महिन्यापासून अडकून पडल्याने परप्रांतीय मजुरांचे पोटापाण्याचे हाल होत होते. त्यातच लॉकडाऊन वाढणार असल्याने या मजुरांनी त्यांच्या मूळ गावी पायी जाण्याचा निर्णय घेतला होता.
ही बाब लक्षात येताच त्यांच्या मदतीसाठी पुणे शहर पोलीस दल सरसावले. शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांच्या नोंदी सुरू करण्यात आल्या. यासोबतच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. जीवनावश्यक साहित्य तसेच चहा, नाश्ता, जेवण देखील पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात आला. पुणे शहर पोलिसांनी मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध करून दिली आहे. परिवहन मंडळाच्या मोफत बसेससह रेल्वे व खासगी बसच्या माध्यमातूनही शहरातील हजारो परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येत आहेत.
पुणे शहरातील हजारो मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणात मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याने पुणे पोलिसांच्या या कार्याबद्दल परप्रांतीय मजूर आभार मानत आहेत.





