पुणे | “अभिजात’ दर्जा मिळाल्याने मराठीजनांचा जल्लोष

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर शहरात अनेक संस्था, संघटनांनी जल्लोष केला. काहींनी पेढे वाटले तर काहींनी अभिमान गीत सादर करून आनंद व्यक्त केला.
“माझी अभिजात मराठी स्वाक्षरी’ उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कसबा विभाग, पुणे शहरतर्फे “माझी अभिजात मराठी स्वाक्षरी’ हा उपक्रम शनिपार चौकात राबवण्यात आला. तसेच २१०० पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी चितळे बंधू मिठाईवाले संचालक श्रीकृष्ण चितळे, मनसे सरचिटणीस ॲड. गणेश सातपुते, रणजीत शिरोळे, उपाध्यक्ष आशिष देवधर, कसबा विभाग अध्यक्ष गणेश भोकरे, आशिष साबळे, नरेंद्र तांबोळी, प्रल्हाद गवळी, निलेश हांडे, सुरेखा होले, सारंग सराफ, आशुतोष माने, आयोजक वसंत खुटवड आदी उपस्थित होते.
पाचशे विद्यार्थ्यानी सादर केले मराठी अभिमान गीत
साईनाथ मंडळ ट्रस्टच्या विद्यमाने शनिवार पेठेतील, एन.ई.एम.एस शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी च्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी मराठी भाषा अभिमान गीत सादर केले.
राष्ट्रीय कला अकादमीचे अमर लांडे यांनी शाळेत दहा फुटांची मराठी अक्षर असलेली भव्य रांगोळी रेखाटली होती.
शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख अणि साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा यांच्या आयोजना मध्ये विद्यार्थी रांगोळीच्या भोवताली गोल उभे राहून मुलांनी मराठी भाषा संवर्धनाचा निश्चय करत मराठी माणसाशी मराठी भाषेतच बोलावे, आणि होय आम्ही चालवू मराठी भाषेचा समृद्ध वारसा, अशी शपथ घेतली.
राष्ट्रीय कला अकॅडमीचेचे अमर लांडे शुभम पळसकर,अतुल निकम, भूषण बोकील, गंधाली शहा, नरेंद्र व्यास आदी उपस्थित होते. पियूष शाह यांनी प्रास्तविक आणि आभार मानले.
जय गणेश व्यासपीठातर्फे “मसाप’चा गौरव
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा यात खारीचा वाटा आहे. आपल्यातील मराठीपणाची ज्योत तेवत ठेवत भाषेसमोरील आव्हाने पेलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानिमित्त पुण्यातील जय गणेश व्यासपीठातर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील रासने, शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन पियूष शहा यांनी, तर आभार शिरीष मोहिते यांनी मानले.
नूमवि प्रशालेत महाराष्ट्र गीताचे गायन
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि नूमवि प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने अभिजात मराठी निर्णयाचा गौरव करण्यात आला.
यावेळी हजार मुलांनी एकत्र येत महाराष्ट्र गीत गात आनंदोत्सव साजरा केला. बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी हेमंत मावळे यांच्या नेतृत्वाखाली नूमवि शाळेतील तब्बल १००० विद्यार्थीं मराठी भाषेचा गौरव करण्यासाठी एकत्रित “महाराष्ट्र गीत” सादर केले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे,
नियामक मंडळाचे सदस्य सुधीर काळकर, शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, प्रबोधिनीचे अरुणकुमार बाभुळगावकर, अक्षदा इनामदार, मुकुंद कोंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश कांबळे,
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माया सोयाम आदी उपस्थित होते. यावेळी प्रशालेत मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.





