Pune : पुण्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न विधानसभेत

पुणे : खडकमाळ पोलीस वसाहतींच्या पुनर्विकसनासह, मामलेदार कचेरीचा पुनर्विकासही रखडला आहे. या दोन्ही कामांंना गती देण्यात यावी, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनात मांडली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभागी झालेल्या रासने यांनी या विषयांवर तातडीनं लक्ष देण्याची विनंती शासनास करण्यात आली.
खडक पोलीस वसाहत 125 वर्षे जुनी आहे. येथील अवघ्या अडीचशे फुटांच्या दुरवस्थेतील कौलारू निवासस्थानात पोलीस कर्मचारी कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहत आहेत. तडे गेलेल्या भिंती, तुटक्या खिडक्या, सांडपाण्याची दुरावस्था अशा स्थितीचा सामना पोलिसांना करावा लागत आहे. त्यामुळे येथील १३९ निवासस्थानांचे पुर्नवसन अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी रासने यांनी केली.
तसेच मामलेदार कचेरीच्या बांधकामासाठी २००४ साली प्रशासकीय मान्यता मिळाली.
परंतु गेल्या २० वर्षांपासून हा प्रकल्प संथ गतीने राहिला. या भागात दुय्यम निबंधक कार्यालय, पुणे शहर तहसीलदार कार्यालय, उमाजी नाईक स्मारक, खडक पोलीस स्टेशन अशी अत्यंत महत्त्वाची कार्यालये आहेत.
परंतु तेथे नागरिकांसाठी कोणतीही व्यवस्था नाही. सर्व्हरबद्दल कायम तक्रारी असतात. कार्यालयांकडे जाणारा रस्ता अरुंद असून अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने येथील कामांना गती द्यावी, अशी मागणी यावेळी रासने यांनी केली.




