#ZIMvIND 3rd ODI : व्हाइटवॉश देण्यासाठी भारतीय संघ सज्ज

हरारे – फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या भारतीय संघाला आज (सोमवार) यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासह त्यांना व्हाइटवॉश देण्याची संधी आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघ नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह अन्य काही प्रमुख खेळाडूंशिवाय या मालिकेत खेळत असला तरीही संघातील नवोदितांनी आपली गुणवत्ता सिद्ध करणारी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले आहेत. आता हा तिसरा सामना जिंकत यजमान संघाला व्हाइटवॉश देण्याची नामी संधी भारतीय संघाला मिळाली आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे
वेळ – भारतीय प्रमाणवेळेनूसार दुपारी 12-45 पासून
ठिकाण – हरारे स्पोर्टस क्लब मैदान, हरारे
थेट प्रक्षेपण – सोनी नेटवर्क
ही यंदाच्या मोसमातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीची भारतीय संघाची अखेरची एकदिवसीय सामन्यांची मालिका आहे. यानंतर भारतीय संघ अमिरातील रवाना होणार आहे. तेथे संघ आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांच्याशी मालिका खेळणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तेथेही भारतीय संघ टी-20 मालिका खेळणार असून त्यानंतर ऑस्ट्रेलियातच होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी होणार आहे.
झिम्बाब्वेचा संघ नवोदित खेळाडूंचा असून त्यांना या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांना रोखताही आले नाही तर गोलंदाजांचा सामनाही करता आला नाही. पहिला सामना 10 गडी राखून तर दुसरा सामना 5 गडी राखून जिंकत भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले. आता या मालिकेतील तिसरा सामना जिंकत झिम्बाब्वेचा संघ मायदेशात प्रतिष्ठा राखतो का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
फिरकीचेच आव्हान
झिम्बाब्वेच्या फलंदाजांना भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामनाच करता आलेला नाही. त्यातही कुलदीप यादव व अक्सर पटेल यांच्या गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजीची वाताहत झालेली पाहायला मिळाली. या अखेरच्या सामन्यातही हेच चित्र दिसणार आहे. आता या अखेरच्या सामन्यासाठी संघातील फिरकी गोलंदाजांमध्ये काही बदल होणार का ते देखिल महत्वाचे ठरेल. मात्र, सध्यातरी कुलदीप व अक्सर हेच निर्णायक ठरतील असे दिसत आहे.





