वरंधा घाटातील बेवारस मृतदेहाची ओळख पटली; दोघांना बेड्या, ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Pune News : भोर परिसरातील वरंधा घाटात बेवारस मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. अखेर या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून, संबधित व्यक्तीची कौटुंबिक वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. संतोष उर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (वय ४० रा. सोनल हायट्स, वडगाव बुद्रुक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
संतोष भिकू पिसाळ (वय ४३, रा. साई प्लॅनेट, वडगाव बुद्रुक, मूळ रा. रांजे, ता. भोर), अनिकेत चंद्रकांत पिसाळ (वय २९, रा. अनंतसृष्टी, आंबेगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने केली आहे. कौटुंबिक वादातून साडूचा खून करून मृतदेह वरंधा घाटात टाकण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती आणि संतोष पिसाळ हे साडू आहेत. संतोष पासलकर याला दारुचे व्यसन आहे. तो काही काम करत नव्हता. दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा. पासलकर आणि पिसाळ हे दोघेही जवळच राहत होते. पासलकर आणि त्याच्या पत्नी यांच्यात वाद होऊन भांडण व्हायचे. त्यावेळी पिसाळ मधस्थी करायचा. ही बाब पासलकर याला खटकत होती.
२३ एप्रिलच्या दिवशी पासलकरने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर पिसाळ भांडण सोडविण्यासाठी घरी आला. त्यानंतर त्यांच्यात सोसायटीच्या आवारात वाद झाला. वादातून पिसाळ आणि त्याचा नातेवाईक अनिकेत यांनी पासलकर याला मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे त्यांनी ठरविले.
यानंतर भोर परिसरातील वरंधा घाटात मृतदेह टाकून देण्यात आला. मृतदेहाला शिर नव्हते. तसेच प्राण्यांनी मृतदेहाची लचके तोडल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे (वय ५२ रा. वारवंड ता. भोर) यांना कळविण्यात आले. दिघे यांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, हवालदार अमाेल शेडगे, बाळासाहेब खडके, मंगेश भगत, धीरज जाधव, धर्मवीर खांडे यांनी ही कामगिरी केली.





