‘माउंट एव्हरेस्ट’ला तापमान बदलाचा फटका, 2000 वर्ष जमलेला बर्फ 25 वर्षात वितळला

लंडन – वातावरणातील बदलाचा म्हणजे तापमान वाढीचा फटका सर्वच घटकांना बसत आहे. पण त्याचा सर्वात मोठा फटका जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टलाही बसला असून गेल्या दोन हजार वर्षांमध्ये जेवढा बर्फ एव्हरेस्टवर जमा झाला होता. तो फक्त पंचवीस वर्षांमध्ये वितळून गेला, असा निष्कर्ष एका संशोधनात समोर आला आहे. क्लायमेट अँड ऍटमॉसफेरीक सायन्स जर्नल या मासिकात याबाबतचा लेख प्रसिद्ध झाला असून गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीमध्ये एव्हरेस्टच्या माथ्यावरील तब्बल एकशे ऐंशी फूट बर्फ वितळून गेल्याचे या लेखात म्हटले आहे.
माऊंट एव्हरेस्ट वरील साऊथ कॉल ग्लेशियर या क्षेत्रामध्ये जे बर्फ जमण्यासाठी तब्बल दोन हजार वर्षे लागली होती. ते बर्फ फक्त पंचवीस वर्षांमध्ये पूर्णपणे वितळून गेले आहे. याचाच अर्थ ज्या प्रमाणात बर्फ तयार होत आहे. त्याच्या 80 पट वेगाने बर्फ वितळत आहे. एव्हरेस्टवरील हिमक्षेत्र वितळण्यास 1950 पासून सुरुवात झाली होती त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये बर्फ वितळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जगातील इतर अनेक पर्वतांवर संशोधन सुरू असले तरी माउंट एवरेस्टकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल ह्या लेखामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. माऊंट एव्हरेस्टवरील बर्फ वितळणे धोकादायक असून आगामी कालावधीमध्ये त्याचा फटका संपूर्ण मानव जातीला बसू शकतो, असा इशाराही या लेखात देण्यात आला आहे.





