Mount Everest : हिमवादळामुळे २०० गिर्यारोहक एव्हरेस्टच्या पायथ्याशी अडकले, तर ३५० गिर्यारोहकांना सुखरुप वाचवले

Mount Everest – हिमालयात निर्माण झालेल्या हिमवादळामुळे माऊंट एव्हरेस्टच्या तिबेटकडील डोंगरउतारावर सुमारे २०० गिर्यारोहक अडकून पडले आहेत. तर ३५० गिर्यारोहकांना गावकऱ्यांनी आणि बचाव पथकांनी सुखरुपपणे वाचवले आहे. ज्या भागामध्ये गिर्यारोहकांनी मुक्काम केला आहे, त्या भागातील हवामान रविवारी अचानक बिघडले.
त्यामुळे स्थानिक गावातील कार्यकर्ते आणि बचाव कर्मचारी अत्यावश्यक वस्तू घेऊन घटनास्थळी रवाना झाले. या भागात शुक्रवारपासून हिमवृश्टी व्हायला लागली आहे. हिमवादळामुळे किमान २०० गिर्यारोहक अडकून पडले आहेत. तर ३५० पेक्षा जास्त गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आले आहे, असे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
हिमवादळामुळे माऊंट एव्हरेस्टच्या चीनच्या बाजूच्या कारमा खोऱ्यातल्या उतारावर किमान १ हजार हौशी गिर्यारोहक अडकले असल्याचे यापुर्वी म्हटले गेले होते. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले व्हिडीओ आणि काही साक्षीदारांच्या माहितीनुसार रविवारी या भागात अचानक थंडगार वारे वाहू लागले आणि गडगडाट सुरू झाला होता.
चीनमधील माध्यमांकडून अद्याप या हिमवादळाच्या स्थितीबद्दलची ताजी माहिती प्रसिद्ध केली गेलेली नाही. आगामी काळातील चीनचा राष्ट्रीय दिन आणि मध्य शरद ऋतू महोत्सवानिमित्त चीनने सध्या १ ऑक्टोबरपासून ८ दिवसांसाठी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.





