Mount Everest : 40 गिर्यारोहकांच्या पथकाकडून एका दिवसात एव्हरेस्ट सर

काठमांडू : जगातील सर्वात उंच शिखर असलेले एव्हरेस्ट एका दिवसात सर करण्याची विक्रमी कामगिरी 40 गिर्यारोहकांच्या पथकाने करून दाखवली आहे. या पथकामध्ये नेपाळी आणि काही विदेशी गिर्यारोहकांचा समावेश आहे. सेव्हन समिट ट्रेकने आयोजित केलेल्या मोहिमेत 12 शेर्पांसह 22 गिर्यारोहक सहभागी होते, असे त्याचे संचालक थानेश्वर गुरागाईं यांनी सांगितले.
या गटात ८ चिनी नागरिक, एक अमेरिकन नागरिक आणि एक जपानी व्यक्ती तसेच १२ माउंटन गाईड होते. त्याचप्रमाणे, ८ के एक्सपिडिशनमधून सात शेर्पांसह १८ गिर्यारोहकांनी माउंट एव्हरेस्ट सर केले. जगातील ८ हजार मीटर उंचीच्या १४ शिखरांपैकी दोनदा चढाई करणारे पहिले व्यक्ती, विक्रमी सानू शेर्पा, माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या नेपाळी शेर्पांमध्ये होते, असे ८के एक्सपिडिशनचे व्यवस्थापकीय संचालक लक्पा शेर्पा यांनी सांगितले.
या वसंत ऋतूमध्ये एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलेल्या इतर गिर्यारोहकांमध्ये चेक प्रजासत्ताकातील दोन आणि युक्रेनमधील सहा गिर्यारोहकांचा समावेश होता, असे लक्पा म्हणाले. या हंगामात अधिक गिर्यारोहक एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करण्याचा प्रयत्न करत आहेत, सुमारे ४५० गिर्यारोहकांनी ते सर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतली आहे.





