शिमला – हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येथे 12 तारखेला मतदान तर 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. यंदा राज्यातील सत्ताधारी पक्षाला बंडखोरीने ग्रासले असून त्यामुळे भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी वाढली आहे.
कांगडा जिल्ह्यातील फतेहपूर येथून पक्षाचे राज्यसभा सदस्य कृपाल परमार यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र तरीही ते रिंगणात कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोदी यांनी परमार यांना खरेच फोन केला असल्याचेही समोर येते आहे. कारण मोदी आणि परमार यांच्यातील चर्चेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कॉंग्रेस नेते श्रीनिवास बी व्ही यांनी हा व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीका केली आहे.
Himachal Assembly Election 2022 : आम्ही मोदींसारखी आश्वासने देत नाही – मल्लिकार्जुन खर्गे
दरम्यान, एका वाहिनीशी बोलताना परमार म्हणाले की, मोदींनी खरेच त्यांना 30 ऑक्टोबर रोजी फोन केला होता. तो फेक कॉल नव्हता. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गेली 15 वर्षे सातत्याने माझा अपमान केला आहे. मी लढणार आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून नाही. ही लढत माझ्यात आणि कॉंग्रेसच्या उमेदवारात होणार आहे. माझे म्हणणे ऐका. माझा तुमच्यावर अधिकार आहे असे मोदी आपल्याला म्हणाले होते. पण मोदीजी नड्डा यांनी 15 वर्षे माझा अपमान केला आहे असे मी त्यांना सांगितले. तुम्ही दोन दिवस अगोदर फोन केला असता तर काही झाले असते आपण त्यांना सांगितले. त्यानंतर मोदींनी शुक्रिया म्हणत फोन कट केल्याचेही त्यांनी नमूद केले.