‘कमळा’ला दिलेले प्रत्येक मत माझी शक्ती वाढवेल – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी डबल इंजिन सरकारचा उल्लेख केला असून राज्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
आपल्या देवभूमीच्या भविष्यासाठी तुम्ही महत्वाचे मतदान करत आहात. तुम्ही दिलेले प्रेम आणि आशीर्वादासाठी तुम्हाला नमन करतो. ही अशी अलौकीक भूमी आहे की जिचे दर्शन एकदा घेतले की आयुष्यभर तिची प्रभा जाणवत राहते. मला तर तुमच्यासोबत राहण्याचे सौभाग्य असंख्य वेळा प्राप्त झाले आहे. त्यात ऋणातून उतराई होण्यासाठी आयुष्यभर हिमाचल प्रदेशची सेवा करणे माझे दायित्व आहे.
गेल्या काही वर्षांत राज्याच्या प्रगतीसाठी डबल इंजिन सरकारने अविरत काम केले आहे. देवभूमीच्या विकासासाठीची ही यात्रा येणाऱ्या वर्षांत अशीच सुरू राहू द्या असे भावनिक आवाहन करत पंतप्रधान म्हणाले की, 2014 मध्ये जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हा या प्रदेशात दुसऱ्या पक्षाचे सरकार होते. त्यांनी केंद्राकडून सुरू करण्यात आलेल्या योजना पुढे जाऊ दिल्या नाहीत. जेव्हा हिमाचलमध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा विकासाची जलद मालिका सुरू झाली. ते तुम्हाला थांबू द्यायचे नाही आहे.





