कल्पनाशक्ती, जिद्द आणि परिश्रमाचे सर्वोच्च शिल्प..; ‘हे’ आहेत जगातील सर्वात उंच रेल्वे पूल

world’s highest railway bridges : रेल्वे हे मानवाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. देशोदेशींच्या आर्थिक विकासात रेल्वेच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कोणीच दुमत देऊ शकत नाही. हे केवळ प्रवासाचे, वाहतुकीचे साधन नसून, हे देशाची प्रगती आणि प्रामाणिकतेचेही प्रतिनिधित्व करतात.
आज आपण अशाच काही रेल्वे पुलांविषयी जाणून घेणार आहोत, जे त्यांच्या उंची, लांबी, रचनेच्या अद्वितीयतेसाठी जगप्रसिद्ध आहेत. या सर्व पूलांमुळे जिथे आधी प्रवास शक्य नव्हता तिथे आता विकासाच्या गाड्या धावत आहेत.
तेथील लोकांचे जीवनमान उंचावले आहे आणि पर्यटनालाही चालना मिळाली आहे. हे पूल म्हणजे केवळ लोखंडी रचना नाहीत तर ‘मानवी कल्पनाशक्ती, जिद्द आणि परिश्रमाचे सर्वोच्च शिल्प’ आहेत
जगातील टॉप ५ रेल्वे पूल :-
१. चिनाब रेल्वे पूल, भारत – जगातील सर्वात उंच रेल्वे पूल :
भारत देशाने गेल्या दशकात अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ‘चिनाब रेल्वे पूल’. जम्मू आणि काश्मीरच्या दुर्गम डोंगराळ भागात बांधलेला हा पूल 359 मीटर उंच आहे आयफेल टॉवरपेक्षा देखील 35 मीटर उंच!
चिनाब नदीवर बांधलेला हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (यूएसबीआरएल) प्रकल्पाचा भाग आहे. 2004 मध्ये या प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली होती आणि अनेक अडथळ्यांवर मात करत 2024 मध्ये या पूलाचे बांधकाम पूर्ण झाले. या पुलाचे उद्घाटन ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.
तसेच या पुलाचे बांधकाम हे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जाते. याच्या निर्मितीसाठी 1,486 कोटी रुपये खर्च झाले असून, हे एक स्टील आर्च पूल आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे 8 रिक्टर स्केलपर्यंतचा भूकंप झेलण्याची त्याची क्षमता. या पुलावरून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ धावणार असून, उत्तर भारत आणि काश्मीर यांच्यातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.
२. नाजिएहे रेल्वे पूल, चीन – अभियांत्रिकीतील दुसरा चमत्कार :
चीनने गेल्या काही वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जो गतीशील बदल घडवला, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘नाजिएहे रेल्वे पूल’. गुईझोउ प्रांतातील या पुलाची उंची 285 मीटर असून तो स्टील आर्च ब्रिज प्रकारात मोडतो.
हा पूल 2016 मध्ये सुरु झाला आणि ‘लिंडाई-झिजिन’ या रेल्वे मार्गाचा भाग आहे. पूल 810 मीटर लांब असून त्याचा मध्यभागीचा आर्च तब्बल 352 मीटर लांब आहे. हा पूल केवळ त्याच्या उंचीमुळेच नव्हे तर अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत बांधल्यामुळेही विशेष मानला जातो.
डोंगफेंग धरणाच्या जलाशयाच्या पातळीपासून या पुलाची उंची मोजली गेली आहे आणि तेथे अत्यंत खोल दरी आहे. या पुलाचा वापर केवळ मालवाहतुकीसाठी नव्हे, तर प्रवासी वाहतुकीसाठीही केला जातो.
३. बीपान रिव्हर शुइबाई रेल्वे पूल – भूतपूर्व पूल :
2001 मध्ये जेव्हा ‘बीपान रिव्हर शुइबाई’ पुलाचे उद्घाटन झाले, तेव्हा तो जगातील सर्वात उंच रेल्वे पूल होता. हा पूल 275 मीटर उंच असून गुईझोउ प्रांतातील लिउपानशुई जिल्ह्यात आहे. या पुलाची रचना एक आर्च ब्रिज प्रकारात मोडणारी असून, याची लांबी 486 मीटर आहे.
यात 236 मीटर लांब आर्चचा समावेश आहे. हे बांधकाम अतिशय कठीण भागात पार पडले असून, डोंगररांगांमधील खोल दऱ्यांतून मार्ग काढत रेल्वे लाइन बांधण्यात आली आहे. हा पूल लिउपानशुई-बैगुओ रेल्वे मार्गाचा भाग आहे आणि पूर्वी तो चीनमधील औद्योगिक मालवाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाचा होता.
४. अंकिंग यांग्च्ये रिव्हर रेल्वे पूल, चीन – सर्वात लांब केबल-स्टेड ब्रिज :
चीनमधील अंकिंग शहरात यांग्त्झे नदीवर बांधलेला ‘अंकिंग यांग्च्ये रिव्हर ब्रिज’ हा जगातील सर्वात लांब केबल-स्टेड रेल्वे पूल आहे. 2015 मध्ये या पुलाचे उद्घाटन झाले. हा पूल सुमारे 3 किमी (2.997 किमी) लांब आहे आणि त्याची मुख्य स्पॅन लांबी 580 मीटर आहे.
पुलाची एकूण उंची 210 मीटर आहे. याची रचना केबल-स्टेड प्रकारात केली आहे, म्हणजे स्टील केबल्सद्वारे पुलाचे वजन पायलॉनवर वितरित केले जाते. हा पूल नांझिंग-अंकिंग इंटरसिटी रेल्वे मार्गावर असून, त्यामुळे या भागातील रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित झाला आहे. यामुळे चीनमध्ये ‘हायस्पीड रेल नेटवर्क’ अधिक गतिमान झाले आहे.
५. गोटेक वियाडक्ट, म्यानमार – ऐतिहासिक वारसा :
गोटेक वियाडक्ट हा पूल 1900 साली बांधण्यात आला होता आणि त्यावेळी तो आशिया खंडातील सर्वात उंच रेल्वे पूल होता. म्यानमारमधील शान राज्यात असलेला हा पूल 102 मीटर उंच आणि 689 मीटर लांब आहे.
या पुलाचे बांधकाम अमेरिकेतील ‘पेनसिल्व्हेनिया स्टील कंपनी’ ने केले होते. हे एक ट्रेसल ब्रिज आहे. म्हणजेच लोखंडी फ्रेम्सवर आधारलेली रचना. गोटेक वियाडक्ट हा पुल फक्त तांत्रिक दृष्टिकोनातूनच नाही तर इतिहासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
आजही हा पूल कार्यरत आहे आणि अनेक पर्यटक फक्त या पुलावरून प्रवास करण्यासाठी या भागात येतात. हा पूल म्यानमारमधील रेल्वेच्या वारशाचे प्रतीक मानला जातो.
दरम्यान, हे रेल्वे पूल जगभरातील केवळ वाहतुकीची गरज भागवत नाहीत, तर ते देशाच्या विकासाची गती दर्शवतात. या पुलांच्या निर्मितीमध्ये सामील असलेले अभियंते, कामगार आणि शास्त्रज्ञ यांची ही एक विजयगाथा आहे.
भारताच्या चिनाब ब्रिजपासून ते चीनमधील बीपान रिव्हर पूल, आणि म्यानमारमधील गोटेक वियाडक्ट हे सर्व पूल आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च मानले जातात. या पुलांचे बांधकाम हे फक्त धाडसाचेच नाही, तर जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण देखील आहे.










