‘गदर’ची हिरोईन अमिषा नाही तर ऐश्वर्या असती; दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

मुंबई – बॉलीवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel) यांच्या ‘गदर 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आतापर्यंत 500 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला असला तरी प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता. यातही सनी देओलने ‘तारासिंग’ नावाची तर अमिषाने ‘सकिना’ नावाची भूमिका साकारली होती. या दोघांच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. मात्र गदर चित्रपटात अमिषाच्या जागी अभिनेत्री ऐश्वर्या राय दिसणार होती, असा खुलासा दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.
एका मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले, ‘निर्मात्यांनी एका अभिनेत्रीसोबत संवाद साधला होता आणि ती सिनेमात सकिना ही भूमिका साकारण्यासाठी देखील तयार होती. माझ्या डोक्यात अनेक अभिनेत्रींची नावे होती. मी त्यांना स्क्रिप्ट देखील सांगितली होती. काही अभिनेत्रींना स्क्रिप्ट आवडली, तर काहींनी सिनेमा करण्यास नकार दिला. या सिनेमासाठी त्यांनी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय यांना विचारलं होत्या. मात्र सिनेमात सकिना ही भूमिका बजावण्यासाठी अभिनेत्रींनी मानधन जास्त मागितले होते.
“चित्रपटाचे बजेट खूपच कमी होते, त्यामुळे निर्मात्यांनी मला अमरीश पुरी किंवा अभिनेत्री यांच्यापैकी एक निवडण्यास सांगितले. अमरीश पुरी खूप महत्त्वाचे होते, त्यांच्याशिवाय चित्रपट बनू शकला नसता.’ असं देखील अनिल शर्मा म्हणाले.





