Ameesha Patel : ‘ते खूप रोमँटिक होतं…’; अखेर हार्दिकसोबत डेटिंगच्या चर्चांवर अमिषा पटेलने मौन सोडलं
Ameesha Patel : अमिषाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत संबंधित युझरला सणसणीत टोला लगावला.

Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतच्या कथित नात्यामुळे चर्चेत आहे. ‘कहो ना प्यार है’ आणि ‘गदर’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अमिषाचा हार्दिकसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अखेर अमिषाने या चर्चांवर प्रतिक्रिया देत अफवांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अमिषा पटेल आणि हार्दिक पांड्या मुंबईतील ताजमहाल पॅलेसमध्ये एकत्र दिसले होते. यावेळी दोघे गप्पा मारताना दिसत असून, अमिषा हार्दिकची आपल्या मित्रांशी ओळख करून देताना दिसली. याचदरम्यान तिने हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या.
नेटकऱ्याच्या पोस्टवर अमिषाचा संताप
व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने तर अमिषा आणि हार्दिक यांच्यातील संभाषण आणि त्यांचं वागणं केवळ मैत्रीपुरतं मर्यादित नसल्याचं सूचित केलं. त्याने व्हिडिओ शेअर करत दोघांच्या कथित नात्याबाबत भाष्य केलं.
अमिषाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत संबंधित युझरला सणसणीत टोला लगावला. अमिषाने उपरोधिक शैलीत म्हटलं की, “तुमचं अगदी बरोबर आहे. अरे देवा, तुमचं बरोबर आहे… खरंच, ज्या प्रकारे मी त्याच्यावर हात ठेवला होता, ते खूप रोमँटिक होतं.” पुढे तिने त्या युझरला म्हटलं की, “मी तुम्हाला ओळखत नाही, पण तुमच्या नक्कीच एकही मैत्रीण नाही. अशा गोष्टींबद्दल पोस्ट करण्यापूर्वी तुम्ही एक मैत्रीण बनवायला हवी.”
पापाराझींच्या प्रश्नावर अमिषाचं मिश्कील उत्तर
दरम्यान, अमिषाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पापाराझींनी तिला हार्दिक पांड्यासोबतच्या व्हायरल व्हिडिओबाबत प्रश्न विचारला. “तुमच्या आणि हार्दिकच्या व्हायरल व्हिडिओबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे?” असा सवाल तिला करण्यात आला. यावर अमिषाने मिश्कीलपणे उत्तर दिलं, “ते इतकं व्हायरल झालंय की आता ते संपलंय.” यानंतर ती घाईघाईने तिथून निघून गेली.
अमिषा पटेल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’मध्ये दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. चित्रपटात तिने सकीनाची भूमिका साकारली होती. आता अमिषाने ‘गदर ३’बाबतही संकेत दिल्याने तिच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.






