‘साहेब पैसे नको, आमचं बाळ परत द्या…’, शिवन्याच्या आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा

जांबुत : साहेब पैसे नको आम्हाला, या पैशाचं आम्ही काय करू..आमचं बाळ आम्हाला परत द्या म्हणत शिवन्याच्या आई-वडिलांनी वन अधिकारी यांच्या समोर हंबरडा फोडला. पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवन्याच्या कुटुंबियांना वनविभागाकडून तत्काळ दहा लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदानाचा धनादेश आई वडीलांकडे सुपूर्द करताना उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षकासह उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचे पहायला मिळाले.
पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनास्थळी जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून बिबट मुक्त होण्यासाठी उपाययोजना याबाबत चर्चा केली. ग्रामस्थांनी बिबट मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी उपवनसंरक्षक यांच्याकडे केली.
या भागातील ग्रामपंचायतचे ठराव वरिष्ठ स्तरावर देऊन बिबटमुक्त परिसर करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना देत संबंधित अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांना उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सुचना केल्या. तसेच घटनास्थळी लावलेल्या पिंजऱ्याची पाहाणी केली.
पिंपरखेड घटनास्थळी एक बिबट जेरबंद झाला असला तरी जोपर्यंत या परिसरातील लोकांना शांततेत रहाता येत नाही आणि हा परिसर बिबट मुक्त होत नाही, तोपर्यंत बिबट जेरबंद करण्याची कार्यवाही अशीच सुरू राहिल असे निर्देश वाईल्ड लाईफ व क्षेत्रीय कर्मचारी यांना देण्यात आल्याचे जुन्नरचे उपवनसंरक्षक खाडे यांनी सांगितले. यावेळी पिंपरखेड गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.




