निवडणूक आयोगाने दिलेल्या नाव आणि पक्षचिन्हाविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात ! ‘या’ तारखेला होणार याचिकेवर सुनावणी

नवी दिल्ली – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव “शिवसेना” आणि “धनुष्य आणि बाण” हे चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे मान्य केले. आता सोमवारी 31 जुलै रोजी या सुनावणीला सुरुवात होणार आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने सांगितले की, अधिवक्ता अमित आनंद तिवारी यांनी याचिकेची तातडीने सुनावणी करण्याची मागणी केली. यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आलेल आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 22 फेब्रुवारीला शिंदे गटाचा जबाब मागवला होता.
आपल्या अर्जात ठाकरे यांनी म्हटले आहे की निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर तातडीने सुनावणीची आवश्यकता आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 11 मे रोजी दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा आदेश पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो आहे.
निवडणुका जवळ आल्या आहेत आणि प्रतिवादी क्रमांक 1 (शिंदे) बेकायदेशीरपणे पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी करण्याची गरज आहे असे त्यांनी या याचिकेत म्हटले आहे. 17 फेब्रुवारी रोजी, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला “शिवसेना” हे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह “धनुष्यबाण” बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.





