पुणे जिल्हा | लाशिरगावच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात

वेल्हे, (वार्ताहर) – नाल्याचे पाणी शिरले विहिरीत; पंचायत समितीचे दुर्लक्ष तालुक्यातील प्रतिष्ठेच्या लाशिरगाव (ता. राजगड) ग्रामपंचायतमध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून करण्यात येत असलेल्या विहीर दुरुस्ती कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला व निकृष्ट दर्जाचे काम झाले.
त्यात भर पडली ती विहिरीत नाल्याचे पाणी शिरल्याने प्यायचे पाणी गढूळ झाले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची धक्कादायक माहिती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सारिका आधवडे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना दिली.
या संदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा पंचायत समिती प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळत असून हे प्रश्न प्रशासनच निर्माण करते की काय..? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. लाशिरगाव ग्रामपंचायतमध्ये अनेक विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्याची सर्व पातळीवर चौकशी चालू आहे.
मात्र, पंचायत समिती राजगड व जिल्हा परिषद पुणे या कार्यालयांमध्ये या भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्याचा प्रकार पाहायला मिळत असून. सरपंच व ग्रामसेवक आणि या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा राजगड पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचेही सारिका आधवडे यांनी सांगितले.
विहीर दुरुस्ती कामामध्ये भ्रष्टाचार झाला असून काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरूपात सांगून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. उलट या बोगस कामाची बिले संगनमताने काढून घेण्यात आली. यास पंचायत समिती प्रशासन सुद्धा जबाबदार असून त्यांच्यावर पण कार्यवाही करावी, अशी मागणी आधवडे यांनी केली आहे.
कोट : सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कामामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाशिरगांव व कातुर्डेवाडीमधील नागरिकांना रोगराईच्या समस्या निर्माण होऊन त्रास होऊ शकतो.
विहीर दुरुस्ती करणाचे काम अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे ओड्यांचे घाण पाणी विहिरींमध्ये येत असून विहिरीतील पाणी वापरण्यायोग्य राहिले नसून त्या पाण्याचा वापर केल्यास गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे.
गावात रोगराई पसरल्यास याला जबाबदार कोण..? सदर कामाची पाहणी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा पंचायत समिती वेल्हे येथे आमरण बेमुदत उपोषण करणार. – सारिका आधवडे, (ग्रा. प. सदस्या लाशिरगाव)
कोट : अनधिकृत सभा मंडप, सलग तीन महिने ग्रामपंचायत मासिक सभेचे प्रोसेडींग बुक रिकामे ठेऊन सभा घेण्यात आल्या, एक कोटी रुपये जल जीवन मिशन अंतर्गत चालू असलेले काम निकृष्ट दर्जाचे, नळ पाणी पुरवठा दुरुस्ती कामात भ्रष्टाचार. या बाबत वारंवार रीतसर तक्रारी करूनही ग्रामपंचायत लाशिरगांवमध्ये झालेल्या चुकीच्या कामांना प्रशासन पाठीशी घालत आहे.
गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही चौकशी केली जात नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई येत नसल्यामुळे व भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक व सरपंच पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात पंचायत समिती वेल्हे येथे आमरण उपोषण करणार आहोत. – अजित आधवडे, (स्थानिक ग्रामस्थ लाशिरगाव)





