पुणे जिल्हा | वाल्हे परिसरात अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे

वाल्हे, (वार्ताहर)- येथील आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी परिसरामध्ये अवकाळी पावसाने वादळी वार्यासह हजेरी लावली. माळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे संपूर्ण छत, तसेच वाल्मिकनगर येथील शाळेचे छत उडाल्याने शाळेच्या चार खोल्यांमधील शालेय कागदपत्रांसह, पाठ्यपुस्तके, संगणक, टीव्ही, खेळाचे साहित्य आदी साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
माळवाडी येथील किराणा व्यावसायिक विमल विष्णू भुजबळ यांच्या किराणा दुकानावरील पत्रे उडाल्याने दुकानातील बहुतांश साहित्य भिजले, तर पानमळा येथील अनिल राजाराम पवार यांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांच्या घरातील सर्व साहित्य भिजून मोठे नुकसान झाले,
तर येथील प्रकाश भुजबळ यांच्या दुचाकीवर विजेचा खांब पडल्याने दुचाकीचेही तर चाहुरवस्ती येथील महेश राऊत यांच्या घराचे संपूर्ण पत्रे उडून गेल्याने पावसामध्ये त्यांच्या घरातील सर्व साहित्य भिजल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला. येथील पंचनामे करण्यात येत आहेत. यावेळी, मुख्याध्यापिका मनीषा चव्हाण, अंगणवाडी पर्यवेक्षिका अनिता भुजबळ, आनंद पवार, विशाल भुजबळ आदी उपस्थित होते.
अवकाळीच्या वादळी वार्यासह पावसाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्यासंदर्भात पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिलेल्या सूचनेनुसार वाल्हे परिसरामधील ठिकठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. -सतीश उमाप, तलाठी माळवाडी





