satara | पालिकेच्या आरोग्य विभागाचे गाडे पुन्हा रुळावर

सातारा, (प्रतिनिधी) – गैरवस्थापनाची बाधा झालेल्या सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे गाडे पुन्हा रुळावर आले आहे. आरोग्य विभागाचे विभाग प्रमुख म्हणून आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांना पुन्हा एकदा कार्यभार सोपवण्यात आला आहे. शुक्रवारी त्यांनी पुन्हा पदभार स्वीकारला. यावेळी आरोग्य कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सातारा शहरात संकलित होणाऱ्या 55 टन कचऱ्याचे व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा सुरळीत करणे हे मोठ्या आव्हान राठोड यांच्यासमोर असणार आहे. सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांना तब्बल चार महिने पाटण नगरपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. पाच दिवस पाटणमध्ये व दोन दिवस साताऱ्यात असे कामाचे स्वरूप होते. राठोड यांच्याकडील कार्यभार वरिष्ठ लिपिक प्रवीण यादव यांच्याकडे देण्यात आला होता.
आरोग्य विभागातील हे बदल कर्मचाऱ्यांच्या पचनी पडले नव्हते . याच दरम्यान साडेसहा कोटींची आरोग्य विभागाची निविदा काढण्यात आली होती. साताऱ्यात कचऱ्याचे संकलन नीट न होणे, ओला सुका कचऱ्याचे वर्गीकरण न होणे, सफाई कर्मचाऱ्यांनी कामावरून परस्पर बेपत्ता होणे, सातारा शहरात ठीक ठिकाणी कचरा पडून राहणे अशा बऱ्याच तक्रारी वाढल्या होत्या कचरा संकलनाचा ठेका प्राप्त झालेल्या वीर सावरकर सेवा संस्थेचे काम योग्य नसल्याच्या तक्रारी होत होत्या.
साताऱ्यात 55 टन कचऱ्यापैकी केवळ 32 टन कचरा उचलला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते वरिष्ठ लिपिक प्रवीण यादव यांचा सुद्धा आरोग्य विभागावर कोणताही वचक नव्हता आणि त्यांचे काम मनमानी पद्धतीने सुरू असल्याचेही समोर आले होते.
या सगळ्या गैरवस्थापनाची प्रशासक अभिजीत बापट यांनी दखल घेऊन पाटण नगरपंचायतीच्या जबाबदारीतून मुक्त झालेले आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांच्याकडे आरोग्य विभागाचा कार्यभार सोपवला आहे.
शहर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान
आठ मे 2024 रोजी याबाबतचा लेखी आदेश प्रकाश राठोड यांना प्राप्त झाला मुकादमांची हजेरी घेणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन ,नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण, साधन सुविधांचे सुलभीकरण इत्यादी जबाबदारी राठोड यांच्याकडे देण्यात आले आहेत.
सातारा शहर स्वच्छ ठेवणे आणि कोठेही कचरा राहणार नाही याची काळजी घेणे ठेकेदाराकडून सर्व संकलन योग्य पद्धतीने करून घेणे ही मोठी आव्हाने राठोड यांच्यासमोर असणार आहेत. गुरुवारी सायंकाळी राठोड यांनी आरोग्य विभागात येऊन आरोग्य निरीक्षक पदाचा चार्ज स्वीकारला.





