Shirur News : शिरूर शहर बसस्थानकातील स्वच्छतागृहात महिलांची, कॉलेज युवतीची कुचंबना थांबेना..

शिरूर : शिरूर शहरातील बस स्थानकात मुजोर ठेकेदाराकडून महीला व मुलींकडून लघू शंकेसाठी पैसे उकळणे सुरुच आहे. त्यांना वारंवार सुचना व समज देवूनही हा प्रकार थांबत नसल्याने लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.आगारप्रमुख याबाबत मुग गिळून गप्प असून महिलांची कुचंबना कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महिला, कॉलेजच्या मुली यांच्याकडून पैसे उकणळ्यात ठेकेदाराबरोबर आगारप्रमुखांचा काही हात आहे का? आणी नसेल तर ते या मुजोर ठेकेदारावर गुन्हा का दाखल करत नाही. त्यांना का पाठिशी घातल आहे. असा सवाल संतप्त महिला प्रवाशी विचारत आहे. एखादा अनुचित प्रकार घडण्याची प्रशासण वाट पाहत आहे का? बेकायदा वसुली या ठिकाणी होत असल्याचे निदर्शनात येत आहे.
याचा मलिदा कोणाकोणाला मिळतो याची चौकशी होणे ही गरजेचे आहे. शिरूर पोलिसांनीही या ठेकेदाराला वेळोवेळी समज देऊनही हे प्रकार काही थांबले नाही. आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार असून महिलांची, कॉलेज युवतींची कुंचबना थांबावी. अन्यथा उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिरुरमधील महिलांनी दिला आहे.





