महायुतीत भडका..! पालकमंत्र्यांनी भान ठेवावे; दीपक केसरकरांचा नितेश राणेंना घरचा आहेर

सिंधुदुर्ग : आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत अंतर्गत कलह उफाळून आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा केल्यानंतर शिंदे गटाच्या माजी मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार प्रतिकार केला. “नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवले पाहिजे. महायुती म्हणून लढलो असतो तर कणकवलीसारखी परिस्थिती निर्माण झाली नसती,” असे खडे बोल सुनावत केसरकरांनी राणेंना फेरविचार करण्याचा सल्ला दिला.
केसरकर पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची युतीला संमती होती. मात्र कुठे माशी शिंकली कळत नाही. नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून युतीसाठी पुढाकार घेतला पाहिजे होता. गेल्या वर्षभरापासून शिवसेना त्यांच्या मागे ठामपणे उभी आहे. आम्ही नेहमी लवचिक आहोत. महाराष्ट्रात जशी महायुती भक्कम आहे, तशी कोकणात राहिली पाहिजे. हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आहे. अजून वेळ गेलेली नाही.” शिंदे गटानेही एकटे लढण्याची तयारी दर्शवली आहे.
दुसरीकडे, नितेश राणे यांनी नाशिक दौऱ्यात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात “हिंदूंनीच दुकाने लावावी” असे वादग्रस्त विधान केले. “ज्यांना हिंदू धर्म, देव-देवता मान्य नाहीत, त्यांच्यावर कुंभमेळ्यात व्यवसायाचे निर्बंध घालावेत,” असे ते म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर हिंदू कार्ड खेळल्याची टीका होत असली तरी नाशिकमधील साधू-महंतांनी राणेंच्या विधानाचे स्वागत केले आहे. सरकारने यात लक्ष घालावे, अशी त्यांची मागणी आहे.





