Sachin Pilgaonkar । Satish shah : गेल्या काही दिवसांपासून सिनसृष्टीतून निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. बॅालिवूड इंडस्ट्रीत कॅामेडी कलाकारांमध्ये ज्यांचे नाव वरच्या स्थानी घेतले जात होते, ते ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. सतीश शाह आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची घट्ट मैत्री होती. मित्राच्या अकाली जाण्याने सचिन यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर ‘न्यूज 18’ ला सचिन पिळगावकर यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करत सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि मधूला भेटून आली होती. सतीशने कोणते तरी गाणे ऐकवले होते. त्यावर मधू आणि सुप्रिया नाचल्या होत्या, अशी आठवण सांगितली. पुढे ते म्हणाले, सतीश आणि मी नेहमी बोलायचो. मेसेज करायचो. मला (25 ऑक्टोबर2025) दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला होता. त्यावेळी तो पूर्णपणे ठीक होता. त्याच्या निधनाची अचानक बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला, असे सचिन पिळगावकर म्हणाले. ही गोष्ट बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर गोंधळ उडाला. काहींनी या घटनेला ‘योगायोग’ म्हटलं, तर काहींनी ट्रोलिंगला सुरुवात केली, “प्रत्येकाच्याच शेवटच्या क्षणी सचिन पिळगावकरांनाच का आठवतं?” असे जोक्स आणि मीम्स व्हायरल झाले. ट्रोल्सना उत्तर देण्यासाठी सचिन पिळगावकर यांनी स्वतःच फेसबुकवर सतीश शाह यांचा शेवटचा मेसेज शेअर केला. त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं “Because of my age, people often think I am mature.” आणि मेसेज पाठवण्याची वेळ होती 12:56 दुपारी म्हणजेच मृत्यूपूर्वी अवघ्या दोन तास आधी. सचिन यांनी लिहिलं, “हा सतीश शाह यांनी मला काल पाठवलेला शेवटचा मेसेज आहे. त्यांचा आत्मा शांती लाभो.” एवढं लिहिताच लोक शांत झाले आणि सर्वांनी सतीश शाह यांच्या आठवणींना उजाळा दिला. सतीश शाह यांनी 1978 ‘अरविंद देसाई की अजीब दास्तां’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांच्या वाट्याला अनेक भूमिका आल्या, त्या सर्वंच भूमिकांचे सोनं त्यांनी केले. सतीश शाह यांची ‘साराभाई वर्सेस साराभाई’ ही मालिका खूप गाजली होती. ‘ओम शांती ओम’, ‘मैं हूं ना’ आणि ‘जाने भी दो यारों’ या सिनेमातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले.