मुंबई – बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ चित्रपटाच्या मोठ्या यशानंतर चाहते शाहरुखच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुखचे ‘डंकी’ आणि ‘जवान’ हे त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 7 सप्टेंबर 2023 रोजी ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. मात्र आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यानंतर आता साऊथचा सुपरस्टार विजय थलापथीची देखील या चित्रपटात ग्रँड एन्ट्री होणार आहे. रिलीजच्या काही दिवसआधी निर्मात्यांनी चित्रपटातील साऊथ सुपरस्टार विजय थलपथीची भूमिका रिव्हील केली आहे. चाहत्यांना विजय थलपथीचा कॅमिओ जवानमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील विजयची झलक पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत.
दरम्यान, हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता विजय सेतुपती देखील दिसणार आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ मधील ‘जिंदा बाद’ नंतर चित्रपटातील दुसरे गाणे ‘चलेया’ देखील रिलीज झाले आहे. अनिरुद्ध यांनी संगीतबद्ध केलेले ‘चलेया’ हे गाणं अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी गायले आहे. हे गाणे शाहरुख खान आणि अरिजित सिंग यांच्या सहकार्याची टाइमलेस जादू परत आणते ज्याने नेहमीच रोमँटिक आणि आकर्षक गाणी दिली आहेत.