Raj Thackeray : “बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांनी राज्याचा बोजवारा उडवला; मुंब्रा अपघातावर राज ठाकरे आक्रमक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान आज सकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
“बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे शहरांचा आणि राज्याचा बोजवारा उडालाय,” असं म्हणत त्यांनी गर्दीचा, नियोजनशून्य नागरी वाढीचा आणि रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा खरपूस समाचार घेतला.
“मुंबईचं विद्रूपिकरण झालंय, सरकार झोपेत आहे”
पुण्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “रेल्वे अपघात ही केवळ ट्रॅकवरील चूक नाही, हे शहरांचं व्यवस्थापन कोलमडल्याचं लक्षण आहे. मेट्रो आणि मोनोने काहीही फरक पडत नाही, मूलभूत प्रश्नांवर सरकार गप्प आहे.” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“रेल्वे मंत्री संध्याकाळी लोकलने प्रवास करून दाखवावं”
राज ठाकरे यांनी थेट रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिलं की, “गर्दीचा अनुभव घ्यायचा असेल, तर मंत्री स्वतः संध्याकाळी लोकल प्लॅटफॉर्मवर जावं आणि सामान्य प्रवाशांसोबत प्रवास करून दाखवावं. तेव्हाच कळेल लोक काय भोगत आहेत,” असं म्हणत राज ठाकरेंनी रेल्वे मंत्र्यांना आव्हान दिलं.
“शहरांच्या समस्या सोडवा, अन्यथा मनसे आंदोलन करेल”
पुढे बोलताना म्हणाले, “रेल्वे दुर्घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. लोकल फेऱ्या वाढवा, नाहीतर आम्ही आंदोलन करू. मुंब्र्यासारख्या धोकादायक वळणांकडे सरकार लक्ष देत नाही,” असं म्हणत राज्य सरकारला थेट इशाराच दिला.
प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न अनुत्तरितच
“लोक फूटबोर्डवरून जीव मुठीत धरून प्रवास करतात. देशात माणसाची किंमतच उरलेली नाही. अपघात होणं आता नित्याचं झालंय. कोण येतंय, काय करतंय हे कुणालाही माहिती नाही,” असं सांगत राज ठाकरेंनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही नाराजी व्यक्त केली.





