Pune District : सहस्रदीपोत्सवाने उजळली गायकवाड सरकार सदर
Pune District : खेड तालुक्यातील दावडी हे गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव आहे. या घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तारात योगदान दिले. पुढे गुजरातमधील बडोदा येथे घराण्याने आपले स्थान निर्माण केले. दावडी येथील सुमारे 700 वर्षे जुन्या भुईकोट किल्ल्यातील गायकवाड सरकार वाड्यात ऐतिहासिक गादी आणि तख्त आजही जतन करण्यात आले आहे.

दावडी : वसुबारसेनिमित्त दावडी-निमगाव (ता. खेड) येथील ऐतिहासिक गायकवाड किल्ल्यातील श्रीमंत गायकवाड सरकार सदर येथे गोमाता पूजन आणि सहस्रदीपोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. हजारो दिव्यांनी ऐतिहासिक सदर उजळून निघाली. गायकवाड स्वराज्य घराण्याचे वंशज, महिला मंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्याचे हे सातवे वर्ष होते.
श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दावडी आणि समस्त ग्रामस्थ दावडी-निमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला. गायकवाड स्वराज्य घराण्यातील महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बडोदा संस्थानचे संस्थापक श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्रांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गायकवाड सरकार तख्ताचे पूजन आणि गोमातेचे पूजन करण्यात आले. उपस्थितांनी सहस्र दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला.
खेड तालुक्यातील दावडी हे गायकवाड स्वराज्य घराण्याचे मूळ गाव आहे. या घराण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्तारात योगदान दिले. पुढे गुजरातमधील बडोदा येथे घराण्याने आपले स्थान निर्माण केले. दावडी येथील सुमारे 700 वर्षे जुन्या भुईकोट किल्ल्यातील गायकवाड सरकार वाड्यात ऐतिहासिक गादी आणि तख्त आजही जतन करण्यात आले आहे. श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित सुरेशराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून या ऐतिहासिक सदरेवर गोमाता पूजन आणि सहस्रदीपोत्सवाची परंपरा सुरू झाली. जगभरात विखुरलेल्या घराण्यातील सदस्यांना मूळ गावाशी आणि इतिहासाशी जोडणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रतिष्ठानचे सचिव तथा वंशावळ संशोधक प्रवीणभय्या दत्ताजी गायकवाड (चांदखेड) यांनी संशोधनातून घराण्याचा इतिहास आणि वंशावळ पुराव्यांसह संकलित केली आहे.
2015 मध्ये शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात गायकवाड घराण्याचा रथ सहभागी झाला. त्यातून घराण्यातील सदस्यांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. 2020 मध्ये ऐतिहासिक सदरेचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याच वर्षी 14 जानेवारीला पानिपत शौर्य दिनानिमित्त पानिपतवीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांना मानवंदना देण्यात आली. वसुबारसेच्या दिवशी गोमाता पूजन आणि सहस्रदीपोत्सवाची परंपराही सुरू करण्यात आली, अशी माहिती अमित गायकवाड यांनी दिली. इतिहासाचे जतन, घराण्याची एकजूट आणि पुढील पिढीला ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणे, हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिव प्रवीणभय्या गायकवाड, उपाध्यक्ष अशोकआबा गायकवाड, विलासराव गायकवाड, बाबासाहेब दिघे, सुरेशआप्पा डुंबरे, रवी गायकवाड, ओंकार गायकवाड, विशाल गायकवाड, आदित्य गायकवाड, ईशान गायकवाड, नितीन गायकवाड आणि प्रताप गायकवाड उपस्थित होते. तसेच पुणे, चांदखेड, कुरुळी, सांगली, सोलापूर, कवठेमहांकाळ, केज (जि. बीड), पंढरपूर, कटगुण आणि तरडगाव (जि. सातारा) येथून घराण्याचे वंशज सहभागी झाले होते.





