Satara : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

कलेढोण : टीसीएस कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. टीसीएस कंपनीची ही बाब गंभीर असल्याने परीक्षार्थींनी संबधित परीक्षा घेणाऱ्या कंपनीची लेखी तक्रार आयोगाकडे केली मात्र यावर आयोगाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. टीसीएस ही परीक्षा घेणारी कंपनी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात असताना पुन्हा पुन्हा त्याच कंपनीला परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट देऊन शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे का? असा सवाल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट क पदाच्या कौशल्य चाचणी परीक्षेची 20 जानेवारी 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याची पूर्व चाचणी परीक्षा आयोगामार्फत 30 एप्रिल 2023 तसेच मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार होते. आयोगाने एकूण पदाच्या एकास तीन परीक्षार्थी स्किल टेस्टसाठी पात्र ठरवले. सदर टेस्ट ही टीसीएस खाजगी कंपनीद्वारे 1 जुलै ते 13 जुलै 2024 यामध्ये घेण्याचे नियोजित केले होते, मात्र कीबोर्डमधे तांत्रिक अडचणी झाल्यामुळे 4 जुलै रोजी टेस्ट सुरू झाल्या. ही चाचणी एसर कंपनीच्या जुन्या कीबोर्डवर घेण्यात आली.
परंतु सदर कंपनीच्या कीबोर्डमध्ये बिघाड असल्याचे परीक्षार्थीना दिसून आले. ही बाब त्यांनी केंद्रावरील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर 5 जुलैपासून लॉजिटेक या कंपनीचे कीबोर्ड देण्यात आले व ९ जुलैपर्यंत परीक्षा पार पडल्या. मात्र पुन्हा 10 जुलै पासून जुनेच तांत्रिक बिघाड असणारे कीबोर्ड टेस्टसाठी देण्यात आले. परीक्षार्थीना पुन्हा अडचणींना सामोरे जावे लागले.
लॉजिटेकच्या तुलनेत एसर कीबोर्ड अपात्र परीक्षार्थीचे प्रमाण दुप्पट आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊनही टीसीएस कंपनीचा सुमार कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले गेले आहे. ही स्किल टेस्ट फक्त पात्रता दर्जाची होती, त्यावरून मेरिट ठरणार नव्हते. मात्र अंतिम निवड मुख्य परीक्षेच्या गुणाानुसार ठरणार आहे.
अगोदरच टीसीएस ही परीक्षा घेणारी कंपनी अनेकदा वादाच्या भोवऱ्यात असताना पुन्हा पुन्हा त्याच कंपनीला परीक्षेचे कॉन्ट्रॅक्ट देऊन शासन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे का? असा सवाल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांच्या मध्ये निर्माण झाला आहे. सदर कंपनीच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठ न्यायाधीकरणांमध्ये अॅड. प्रवीण कांबळे आणि अॅड. अमोल चालक यांनी परीक्षार्थीनी याचिका दाखल केली.
पात्र उमेदवारांचे डीफॉल्ट कीबोर्डमुळे नुकसान
एमपीएससी गट क वर्गाची कौशल्य चाचणी देत असताना एसर कीबोर्डमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने बॅकस्पेस, स्पेसबार आणि इतर अनेक बटनामध्ये अडथळा होता. यासंदर्भात सुस्थितीत कीबोर्डची मागणी केली असता काही उमेदवारांना कीबोर्ड बदलून दिले तर काहींना बदलून देण्यास असमर्थता दर्शवली. ज्या उमेदवारांना कीबोर्ड बदलून दिलेत त्यात सुध्दा अनेक समस्या आढळून आल्या. यामुळे ४ जुलै मराठी तसेच १० जुलै ते १३ जुलै (इंग्रजी) भाषेतील कौशल्य चाचणीस पात्र उमेदवारांचे डीफॉल्ट एसर कीबोर्डमुळे नुकसान झाले.
– संतोष माळी (परीक्षार्थी )





