महिला आयोगाचा कारभार म्हणजे ‘वराती मागनं घोडं’; रोहिणी खडसेंची चाकणकर, वाघ यांच्यावर टीका

Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून वैष्णवीच्या आई वडिलांकडून सासच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. तर सासरा आणि दीर फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी जोरदार टीका केली आहे.
वराती मागनं घोडं
रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, “आपल्या महिला आयोगाचा कारभार हा असा आहे ‘वराती मागनं घोडं’. बरं, बाईंचा आविर्भाव पण असा की जणू काही कोणत्या तरी चांगल्या कामासाठी देशाला संबोधित करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
दाल में कुछ काला है !
तसेच कालपरवा छगन भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असताना बाई सर्वात आधी स्वागतासाठी उभ्या होत्या. समोर मीडिया होती, पण त्यावेळी बाईंनी वैष्णवीच्या केसवर बोलणे टाळले. त्यामुळे या प्रतिक्रियेवर आम्हाला वाटते की ‘दाल में कुछ काला है !’ ही जबरदस्तीने द्यायला सांगितलेली प्रतिक्रिया आहे का? हा प्रश्न आमच्या मनात आहे,” असंही रोहिणी खडसे यांनी म्हंटल आहे.
अजित पवारांवर साधला निशाणा
वैष्णवीची केस ही पुण्याची आहे, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. हगवणे हा अजित दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. पण अजित दादांनी अद्यापही या प्रकरणात शब्द उच्चारला नाही. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीही या हगवणेची हकालपट्टी केल्याबाबतची नोटीस काढायला हवी होती.
पण अजूनही त्याची हकालपट्टी केली गेली नाही. एरवी सर्व गोष्टींमध्ये बोलणाऱ्या चित्रा वाघही या प्रकरणात गप्प आहेत. या अर्थ असा की, सत्तेतील सर्वच लोक ‘आपला’ म्हणून हगवणेला वाचवत आहेत. त्यामुळे अजूनही आरोपी सापडत नाही, त्यांची हकालपट्टी होत नाही आणि पाठराखण केली जात आहे, असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला आहे.





