पुणे जिल्हा | नवीन रस्त्याच्या फूटपाथला मुरूम कमी टाकल्याने रस्ता तुटला

भाटघर, (वार्ताहर) – कापूरहोळ- भोर रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण एक वर्षापासून सुरू आहे. बहुतेक ठिकाणी एक बाजू पूर्ण झाल्याने नवीन सिमेंटच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू केली आहे. परंतु काही ठिकाणी रस्त्याच्या फुटपाथला मुरूम कमी टाकल्याने या ठिकाणी रस्ता लेव्हलपेक्षा फुटपाथ खाली गेले आहेत. या ठिकाणी दोन अवजड वाहने क्रॉस होताना वाहनाचा टायर फुटपाथला जात असताना रस्त्याची किनार तुटत आहे.
गेल्या एक वर्षापासून कापूरहोळ-भोर-वाई रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सद्यस्थितीला काम प्रगतीपथावर आहे. कापूरहोळपासून भाटघर धरणाच्या दक्षिण बाजूच्या गेटपर्यंतचे काम झाले आहे. रस्त्याचे काम झाल्याने फुटपाथला मुरूम टाकून एका बाजूने वाहतूक सुरू केली आहे.
परंतु सांगवी (ता. भोर) गावच्या हद्दीतील रस्त्याच्या चढावरील फूटपाथला मुरूम कमी टाकला आहे. यामुळे रस्ता लेव्हलपेक्षा अंदाजे तीन ते चार इंच फूटपाथ खाली गेले आहे.
या नवीन रस्त्यावरून एका बाजूने वाहतूक सुरू केली आहे. अवजड वाहने सांगवी गावच्या हद्दीतून जात असताना वाहन खाली उतरवले असता नवीन रस्त्याची किनार तुटत आहे. संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर फुटपाथच्या मुरमात भर न टाकल्यास रस्त्याच्या किनारचा बराचसा भाग तुटण्याची शक्यता आहे.
कोट : “सांगवी येथील काही ठिकाणी रस्त्याच्या फुटपाथला मुरूम रस्ता लेव्हलपेक्षा कमी आहे. यामुळे नवीन रस्त्याची किनार तुटत आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराने फुटपाथला मुरूम टाकण्याची गरज आहे. ” – कौशल बांदल, उपसरपंच, सांगवी ता. भोर





