satara | मेघा इंजिनिअरिंग खेळतेय प्रवाशांच्या जीवाशी

कृष्णानगर, (वार्ताहर) – सातारा-लातूर महामार्गवर सत्यमनगर या उपनगरात महवितरण कंपनीचा विजेचा खांब रस्त्याच्या मधोमध असूनही या रस्त्याचे क्राँक्रिटीकरण गुरुवारी करण्यात आले. या खांबामुळे अपघात होऊन जीवितहानीची शक्यता आहे.
या रस्त्याचे काम मेघा इंजिनिअरिंग कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून करत असून. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. वाहनचालक व प्रवाशांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी कंपनी घेताना दिसून येत नसल्याने, या रस्त्यावर अनेक छोटेमोठे अपघात होत आहेत. या कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे एका युवतीला नाहक जीव गमवावा लागला होता. या रस्ताच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, कोरेगावकडून येणारी वाहने अत्यंत वेगात असल्याने हे काम थांबवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
याबाबत कंपनीचे साइट इंजिनिअर नायडू यांच्याशी संपर्क साधला असता, महावितरणकडून सहकार्य मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर महावितरणचे अभियंता सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे अधिकारी चर्चेसाठी येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर खांब हटवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या टोलवाटोलवीमध्ये एखादा बळी गेल्यास, जबाबदारी कोणाची, हा प्रश्न अनुत्तरीत रहात आहे. मेघा इंजिनिअरिंग कंपनीला काळ्या यादीत टाकून, कंपनीच्या जबाबदार अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी कंपनीस काम जलदगतीने व दर्जेदार करण्याची ताकीद दिली असूनही, काम संपविण्याच्या नादात कंपनी व्यवस्थापन प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. मात्र, प्रशासन मूग गिळून गप्प आहे, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.





