ओझर – श्रीक्षेत्र ओझर येथील अशोक भालचंद्र जगदाळे यांनी गोवा येथे झालेल्या इंटरनॅशनल आयर्न मॅन स्पर्धेत विक्रमी कामगिरी करून आयर्न मॅन हा किताब पटकावला व ओझरचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावले. या स्पर्धेमध्ये २ किलोमीटर समुद्रामध्ये पोहणे, ९० किलोमीटर अतिशय खडतर अशा रस्त्याने सायकलिंग करणे व २१ किलोमीटर रनिंग करणे या बाबींचा समावेश होता. या सर्व बाबी आठ तासांचे आत त्यांनी पूर्ण करून हा किताब पटकावला. तब्बल २७ देशांमधील स्पर्धकांचा यामध्ये समावेश होता. स्विमिंग करतांना लाटा आणि जल फिश यांना सामोरे जाऊन हे दोन किलोमीटर अंतर पूर्ण करावे लागते. सायकलिंग करताना ४० डिग्री सेल्सिअस तापमानाला सामोरे जात ही सायकलिंग पूर्ण करावी लागते. त्यांनी कोल्हापूर येथे बर्ग मॅन व लोहपुरुष हा किताब २०२४ मध्ये पटकावला होता. व २०२५ मध्ये ओझर येथे झालेल्या बर्गमन स्पर्धेत बर्गमॅन हा किताब पटकविला. ऑडक्स इंडिया या क्लबमधून २००,३००,४०० व ६०० किलोमीटर सायकलिंग दिलेल्या वेळेपेक्षा अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी पूर्ण करून एस.आर. ही पदवी प्राप्त केली होती. पंढरपूर ते घुमान ही सायकल वारी सुद्धा त्यांनी २२ दिवसात पूर्ण केली आहे. या यशामध्ये ओतूर सायकल ग्रुपचे सर्व सदस्य, ओझर स्विमिंग ग्रुप, विघ्नहर ट्रस्ट, ग्रामस्थ ओझर, तसेच जयसिंग डुंबरे, गणेश डुंबरे,प्रदिप गाढवे,सोपान नलावडे, अमोल तांबे, डॉ. राहुल तांबे डॉ. अमोल डुंबरे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी विनम्रपणे सांगितले. सर्व स्तरांतून जगदाळे यांचे कौतुक होत आहे.