#IPL2021 #Qualifier1 #DCvCSK | चेन्नईसमोर दिल्लीचे कडवे आव्हान

दुबई – आयपीएल 2021 आता निर्णायक टप्प्यात आले असून आजपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. यामधील पहिला प्लेऑफचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यात चेन्नईचा अनुभवी कर्णधार एम एस धोनीसमोर दिल्लीचा युवा कर्णधार ऋषभ पंतचे कडवे आव्हान असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने सलग तिस-या वर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश करत विजेतेपदावर दावेदारी केली आहे. आतापर्यंतच्या सामन्यात दिल्लीने भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला आहे. तसेच फलंदाजीमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
गोलंदाजीत कगिसो रबाडा आणि अवेश खान यांनी यशस्वीपणे मारा केला आहे. तसेच फिरकीपटू आर. अश्विन आणि अक्षर पटेल हे धावांवर अंकुश ठेवत विकेट घेण्यात माहिर आहेत. यामुळे गतवर्षी अंतिम सामन्यात पराभव झालेला दिल्लीचा संघ विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली आतापर्यत आठ वेळा अंतिम फेरी गाठली असून तीन वेळा जेतेपदही जिंकले आहे. तसेच गतस्पर्धेतील अपयशानंतर यंदाच्या मोसमात अपेक्षानुसार खेळ उंचावित प्लेऑफमध्ये स्थान मिळविले आहे. या सामन्यात अंबाती रायडू, सुरेश रैना आणि फाफ डु प्लेसिस यांनी निर्णायक खेळी केल्यास दिल्लीवर दबाव निर्माण करू शकतात.
दरम्यान, गुणतालिकेत 20 गुणांसह दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर 18 गुण आणि चांगल्या धावगतीसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.दिल्ली आणि चेन्नई आतापर्यंत 25 लढतीत आमनेसामने आले आहे. यात 10 वेळा दिल्ली, तर 15 वेळा चेन्नईने बाजी मारली. मात्र, यंदाच्या हंगामात झालेल्या दोन्ही लढती रिषभ पंतच्या दिल्लीने जिंकल्या आहेत. एकाच हंगामामध्ये चेन्नईला दोनदा पराभूत करणारा पहिला संघ होण्याचा मानही दिल्लीने मिळवला आहे.





