मुंबई – इस्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3′ मोहिमेतील अंतिम टप्प्यामध्ये विक्रम लॅंडरने चंद्राच्या भूमीवर यशस्वीपणे लॅंडिंग केले. भारताने चांद्रयान-3 मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे.
भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत. आणि अखेर काल बुधवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केले. यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. या मोठ्या कामगिरीनंतर इस्रोचं संपूर्ण जगातून कौतुक होत आहे.
अनेक राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर करत या अद्भुत कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केले. अशातच आता अभिनेते सचिन पिळगावकर यांची चांद्रयान-3 बद्दल केलेली एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. नेटकरी देखील यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या ऑल टाईम हिट सिनेमा “अशी ही बनवाबनवी’ यातील एक खास क्षणाचा फोटो शेयर केला आहे. सचिन पिळगांवकर यांनी शेयर केलेल्या फोटोत लक्ष्मीकांत बेर्डे दिसत आहेत, ज्यांनी या सिनेमात पार्वती बाईची भुमिका साकारली होती. पार्वतीच्या डोहाळे जेवणादरम्यानच्या सीनवेळी हा फोटो काढण्यात आला होता. ज्यात ते चंद्रावर बसले असल्याचं दिसत आहे. हा एक आयकॉनिक फोटो म्हणून देखील ओळखला जातो.
हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतांना सचिन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “चंद्रावर बसणारा पहिला भारतीय…’. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, नेटकरी या पोस्टला भन्नाट कमेंट करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीचा आत्मा समजला जाणारा ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा 23 सप्टेंबर 1988 रोजी रुपेरी पाड्यावर आला होता. चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. सध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना नेमक्या शब्दात मांडण्यासाठीही या चित्रपटातील संवाद, दृश्यं यांचाच सर्वाधिक वापर केला जातो.