रांजणगाव गणपतीमध्ये आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

रांजणगाव गणपती : फंडवस्ती, रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील एकोणतीस वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह निघाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे व रांजणगाव गणपती प्राथमिक रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी महेश सातव यांनी सांगितले. यामुळे रांजणगाव परिसरात खळबळ उडाली असून रांजणगाव मध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.
या कोरोना पॉझिटिव्ह च्या संपर्कात आलेले 35 जण क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील 15 जण हाय रिक्स, तर वीस जण लो रिक्स संपर्कात आलेले आहेत.
रांजणगाव येथील फंडवस्ती येथे राहणारा 29 वर्षीय व्यक्तीचे पुण्याला येणे जाणे होते. काल त्यास त्रास होऊ लागल्याने तो रांजणगाव प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी आला होता. तो संशयित वाटल्याने त्याला वाघोली येथील कोविड सेंटर येथे तपासणीसाठी पाठवला होता. येथे काल त्याचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव आला असल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले . याबाबत रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीस सूचना दिल्या असून त्या भागामध्ये औषध फवारणी करण्याचे काम सुरू आहे.





