Kerala : फटाक्यांची आतिषबाजी आली अंगलट; केरळातल्या ‘या’ स्टेडियमवर आगीची दुर्घटना, सुदैवाने ‘ही’ गोष्ट टळली अन्यथा..

केरळः केरळमधील मलप्पुरम येथील फुटबॉल स्टेडियमध्ये एका सामन्यादरम्यान आग लागल्याची दर्घटना घटना घडली आहे. येथील एरिकोडच्या फुटबॉल स्टेडियममध्ये सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये फटाके फोडण्यात आले आणि आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नसून ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. यापैकी १० जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेव्हन्स फुटबॉल स्पर्धा एरिकोडच्या स्टेडियममध्ये सुरू होणार होती. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या आतिषबाजीमुळे फटाके फोडल्यानंतर ते दूरवर पसरले, त्यामुळे मैदानावर बसलेले दर्शक यामध्ये जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युनायटेड एफसी नेल्लीकुथ आणि केएमजी मावूर यांच्यातील अंतिम सामन्या दरम्यान ही आगीची दुर्घटना घटना घडली असल्याचे समोर आले आहे.
टेकड्यांवरही आगीची दुर्घटना
दुसरीकडे, केरळच्या पहाडी जिल्ह्याच्या वायनाडच्या कंबामाला जंगलात लागलेल्या आगीत गवताळ प्रदेशाचा काही भाग नष्ट झाल्यानंतर मंगळवारी त्याच टेकड्यांमध्ये पुन्हा आग लागली. ही ‘नैसर्गिक घटना’ नसल्याचा वनविभागाचा संशय आहे. सोमवारी लागलेल्या आगीत अंतर्गत जंगलातील सुमारे 10 हेक्टर गवताळ प्रदेश जळून खाक झाल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. वन व अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मात्र, मंगळवारी त्याच टेकडीवर पुन्हा एकदा आगीच्या ज्वाला पसरल्याने याबाबत वनविभागाकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
वनविभागाला संशय
उत्तर वायनाड विभागीय वन अधिकारी (डीएफओ) मार्टिन लव्हेल यांनी एका व्हिडिओ संदेशात या घटनेवर संशय व्यक्त केला असून आग नैसर्गिक असल्याचे दिसत नाही, असे म्हटले आहे. कोणीतरी मुद्दाम आग लावली असावी, कारण ही घटना जंगलाच्या आतील गवताळ प्रदेशात घडली आहे, जिथे अशी आग सहसा नैसर्गिकरित्या लागत नसल्याचे या व्हिडिओत मार्टिन लव्हेल म्हणाले आहेत.



