Pune District : लवकरच अर्थखाते आपल्याकडे येणार : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जय पवार यांचा विश्वास
Pune District : बारामती येथे आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते.

बारामती : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देशात सर्वाधिक मतांनी निवडुन दिल्याने सर्वांचे आभार व्यक्त करतो. दादा आपल्याला लवकर सोडतील, असं कोणालाही वाटले नव्हते. अर्थखाते आपल्याकडे नसल्यामुळे विकासकामे थांबली असल्याचे बोलले जाते. मात्र, तसे काही नाही. त्यावेळी अर्थसंकल्प मांडायचा असल्याने मुख्यमंत्री यांनी ते खाते त्यांच्याकडे ठेवले. काही दिवसांपूर्वी पार्थ, सुनेत्रा पवार यांची आमची याबाबत चर्चा झाली.
लवकरच अर्थखाते आपल्याकडे येईल,असे मुख्यमंत्री बोलले आहेत. तसेच ‘दादां’ची विकासकामांची स्वप्न पूर्ण होइल,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी दिली. बारामती येथे आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. जय पवार पुढे म्हणाले, दादांसारखे काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझी परदेशी कंपन्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. बारामतीत त्या कंपन्या आणून रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्शील आहोत.
रविवारी काल अधिकारी आणि दुबई येथील एक्सपर्टला बोलविण्यात आले होते. आम्ही एअरपोर्टवर गेलो होतो. ‘लोकसभा निवडणुकीच्या काळातच अजित पवार यांच्यासमवेत हे एअरपोर्ट सुरक्षित करण्याबाबत चर्चा झाली होती. दादा आणि अनेक व्हीआयपी एअरपोर्टवर येतात. निवडणूक झाल्यावर हे काम करण्याचे त्यांचे नियोजन होते. बारामतीचा विकास कधीही थांबता कामा नये, असे ‘दादां’चे स्वप्न होते.
सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाहात केलेल्या डान्स वरुन काहींनी ट्रोल केले. त्या लोकांना मला उत्तर द्यायचे आहे. राजकारण सगळे बाजूला आणि कुटुंब वेगळे आहे, अशी ‘दादां’चीच शिकवण आहे. त्यामुळे ट्रोलर्सच्या ‘कमेंट्स’ने काहीही फरक पडत नाही. मला माझ्या जनतेची काळजी महत्त्वाची आहे. २६ जानेवारीला झालेल्या भेटीत ‘दादां’नी शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. ३ वर्षे शांततेत जे काही असतील काम करू, सुट्टीवर जाऊ, असे दादा म्हणाले होते.
जीवन वेगाने बदलले
मात्र, २८ तारखेला आपले सगळ्यांचे जीवन बदलले. मात्र, माझे, पार्थदादा आणि वहिनींचे जीवन खूप वेगाने बदलले. जबाबदाऱ्या वाढल्या, आम्हाला कधीही ही वेळ येईल, असे वाटले नव्हते. सर्वांना आधाराची गरज होती. त्यामुळे बारामती आणि राज्यातील जनतेसाठी झटायचे ठरवले. त्या पद्धतीनेच आम्ही काम करतोय, असे पवार म्हणाले.
अजित पवार यांचे स्मारक पुणे, मुंबईत करण्याची देखील मागणी होती. मात्र, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांसमवेत चर्चेनंतर ‘दादां’चे बारामतीत स्मारक उभारणार आहे. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगवणे, गटनेते बाबा चोरमले, उपगटनेते नितीन काकडे आदी उपस्थित होते.





