Dr. Rajendra Rupanwar : शेवटच्या जबाबाने सगळे चक्रावले; डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात मोठी माहिती समोर, धक्कादायक खुलासे होणार?
Dr. Rajendra Rupanwar : डॉ. राजेंद्र रुपनवर असे मृत डॉक्टरांचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Dr. Rajendra Rupanwar : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. आता त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या आणखी एका डॉक्टरने आपले जीवन संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. राजेंद्र रुपनवर असे मृत डॉक्टरांचे नाव असून, या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी २७ तारखेला मुंबईतील सायन रेल्वे स्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबात डॉ. रुपनवर यांनी, “माझी कुणाबद्दलही तक्रार नाही. मृत्यूनंतर माझा देह एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी दान करण्यात यावा,” अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. या जबाबामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय होती, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांवर येणारे मानसिक दडपण आणि रुग्णालयातील परिस्थितीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फलटणच्या शासकीय रुग्णालयात नेमके काय घडत आहे आणि तेथील डॉक्टरांवर वारंवार मानसिक तणाव का निर्माण होत आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
सुषमा अंधारेंचा सवाल
काही प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयातील अंतर्गत वाद आणि बदलीच्या कारणामुळे डॉ. रुपनवर मानसिक तणावात होते, अशी चर्चा आहे. डॅा. राजेंद्र रुपनवर यांनी आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांशी काही त्रासाबाबत चर्चा केल्याची माहितीही समोर येत आहे. या सर्व बाबींची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबीयांची भूमिका
या प्रकरणानंतर वैद्यकीय अधीक्षकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनीही गंभीर भूमिका घेतली आहे. जोपर्यंत आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी
डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी जेजे मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ते फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली असून, या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली जात आहे.





