पुणे जिल्हा | माळेगांव साखर कारखान्याचा अंतिम भाव ३६३६ रुपये जाहीर

माळेगाव, (वार्ताहर) – माळेगांव सहकारी साखर कारखान्याचा हंगाम २०२३-२०२४ चा अंतिम भाव ३६३६ रुपये प्र.मे.टन जाहीर करण्यात आला आहे.
हंगाम २०२३-२०२४ मध्ये कारखान्याने १३२७९०८.६५३ मे. टनाचे गाळप केलेले असून रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० किंटल साखर पोती उत्पादन झालेली असून संचालक मंडळाने २०२३-२०२४ हंगामामध्ये गाळप केलेल्या सभासदांचे ऊसास रुपये ३६३६/- प्र.मे.टन व गेटकेन गाळप केलेल्या ऊसास रुपये ३२०० प्र.मे.टन प्रमाणे अंतिम दर देण्यांत येणार आहे, अशी माहिती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप यांनी दिली.
या शिवाय व्हरायटी ऊसास अनुदान रुपये १०० व खोडवा अनुदान रुपये १५० प्र.मे.टन असे एकुण सभासदांना व्हरायटी ऊस धारकास रुपये ३७३६ प्र.मे.टन, खोडवा ऊस धारकास ३७८६/- प्र.मे.टन या प्रमाणे ऊसाचा भाव मिळणार आहे.
हंगाम २०२३-२०२४ मधील कारखान्याची एफ.आर.पी. रुपये ३६९४.३१ त्यामधून ऊस तोडणी वाहतूक खर्च ८६३.६४ वजा जाता निव्वळ देय एफ.आर.पी. रुपये २८३०.६७ प्र. मे. टन आलेली असुन ऊस पुरवठादारांना पहिला हप्ता रुपये ३००० रुपये प्र.मे.टन व सभासदांना खोडकी अनुदान रुपये २०० प्र.मे.टन अदा केलेले आहेत
आता जाहीर केलेल्या भावानुसार उर्वरित देय रक्कमेपैकी सभासदांना रुपये २५० प्र.मे.टन व गेटकेन धारकांना रुपये १०० प्र.मे.टनाप्रमाणे दिपावली पूर्वी अदा करणार असून उर्वरित पेमेंट रक्कम मकर संक्रातीपूर्वी अदा केली जाईल.
सहकारी चळवळीच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचे हेतुने कारखान्याने साखर उद्योगाच्या व उपपदार्थ निर्मीतीची यशस्वी वाटचाल केलेली आहे. यामध्ये कारखान्याचे संचालक मंडळ, कर्मचारी, अधिकारी यांचा मोलाचा वाटा आहे. सन २०२४-२०२५ चे हंगामाचे पूर्वतयारीसाठी कारखान्यामधील अंतर्गत कामे चालू असून गळीत हंगाम वेळेत सुरू करण्याचे दृष्टीने सर्व विभाग प्रमुख प्रयत्नशिल आहेत.
सर्व कामांची वेळेत पूर्तता करणेबाबत चेअरमन, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक यांनी सूचना केलेल्या आहेत.
या वर्षी पर्जन्यमान चांगले असून या हंगामांत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा मानस कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याने जाहीर केलेला भाव हा राज्यांत उचांकी स्वरुपाचा आहे.
त्यामुळे कारखान्याचे व्यवस्थापन, सभासद व कर्मचारी यांचेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या उबांकी ऊस दरामध्ये कारखान्याचे सभासद, व्यवस्थापन, कर्मचारी, अधिकारी यांचे मोठे योगदान आहे.




