Shashikant Tarange : “गरजवंतांचा लढा श्रीमंतांच्याच फायद्याचा”; प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे

इंदापूर : महाराष्ट्रात आज आरक्षण हीच प्रगतीची मुख्य किल्ली बनली आहे. आपल्यासारख्या गरजवंतांची प्रगती फक्त आरक्षणावरच अवलंबून आहे. असे का वाटायला लागले, हा खरोखरच गंभीर विचार करण्याचा विषय आहे. स्वातंत्र्यानंतर एवढा दीर्घ काळ गेला, पण राज्यकर्त्यांना आरक्षणाशिवाय प्रगतीचा दुसरा मार्ग निर्माण करता आला नाही, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी व्यक्त केली. ते इंदापूर येथे बोलत होते.
तरंगे म्हणाले, आरक्षणाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हा आत्मविश्वास जनतेमध्ये निर्माण करण्याचे काम राज्यकर्त्यांनीच केले. आरक्षणाने प्रगती होणार असेल, तर ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिले, त्यांची प्रगती महाराष्ट्रात किती टक्क्यांनी झाली? आणि ज्यांची प्रगती झाली, त्यांपैकी किती जणांनी आपल्या जातीतीलच गरजूंना संधी मिळावी म्हणून, स्वखुशीने आरक्षणातून मुक्त होण्याची मागणी केली? उत्तर स्पष्ट आहे. अशी एकही उदाहरणे दिसून येत नाहीत.
प्रत्येकाला स्वतः बलवान व्हायचे आहे, मग तो कोणत्याही जातीतला, भावकीचा किंवा नात्यागोत्यातला असो. “मीच वर चढलो पाहिजे” हा भाव मनामनांत घर करून बसला आहे. म्हणूनच आरक्षणाचा खरा हेतू म्हणजे गरजवंतांचा उद्धार तो हरवत चालला आहे, आणि त्याचा लाभ श्रीमंतांना अधिकाधिक मिळत आहे. आता “मागणारे” आणि “अडवणारे” यांच्या संघर्षाला उधाण आले आहे, असं शशिकांत तरंगे यांनी सांगितले.
राज्यांत पिढ्यानपिढ्या विधानसभेत, लोकसभेत, विधान परिषदेत, राज्यसभेत, साखर कारखानदारीत, सहकारी बँकांत, कृषी उत्पन्न बाजार समित्यांत आणि मोठ्या उद्योगधंद्यांत एकाच कुटुंबांचा मक्तेदारीने प्रभाव राहिला आहे. त्यांनी आपल्या घरातील जागा सोडून एखाद्या खऱ्या गरजवंताला संधी दिली का? याचा प्रामाणिक विचार गरजवंतांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे आवाहन तरंगे यांनी केले.





