चंदीगड : येथील जिल्हा न्यायालयातच आज गोळीबाराची घटना घडली. या घटनेत पंजाब पोलीस दलातील माजी महानिरिक्षक असलेल्या सासऱ्याने त्याच्या जावयाची हत्या केली. दोन्ही कुटुंबांमध्ये कौटुंबिक वाद होता, त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. आज या प्रकरणातील दोन्ही पक्षकार कुटुंब न्यायालयात उपस्थित होते. यावेळी आरोपी मलविंदर सिंह सिध्दू याने चर्चा सुरू असतानाच आपल्याला वॉशरूममध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याचा आयआरएस असलेला जावई त्यांना वाट करून देण्यासाठी त्यांच्यासोबत गेला. त्याचवेळी त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यांनी पाच गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या जावयाला लागल्या. घटनेमुळे न्यायालयातच एकच खळबळ उडाली. पोलिसांनी यावेळी ताबडतोब आरोपीला एका खोलीत बंद केले. जखमीला रूग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.