जवान सूरज यादव यांच्या कुटुंबीयांचे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सांत्वन

कराड – येरवळे, ता. कराड गावचे जवान सूरज मधुकर यादव यांचे आसाम येथील दिमापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (दि. 22) येरवळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 23) माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी जवान सूरज यादव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले.
याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजितराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, येरवळेचे माजी सरपंच सुभाषराव पाटील अणि ग्रामस्थ उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून आणि जिल्ह्यातील काही गावे सैनिकांची गावे म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत.
सूरज यादव यांचे वडील मधुकर यादव हेदेखील माजी सैनिक आहेत. संरक्षण दलांबद्दल आपल्या देशातील सर्वच नागरिकांच्या मनात कायम सद्भावना असते. त्यामुळे सैनिकांच्या त्यागाला आपण सर्व जण कायमच सलाम करतो. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभाव असलेल्या आणि देशाबद्दल समर्पणाची भावना असलेल्या सूरज यादव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि येरवळे ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामधून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती त्यांना मिळो, अशी प्रार्थना मी करतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही जवान सूरज यादव यांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.





