भाजपा सरकारचे अपयश आर्थिक मंदीमुळे चव्हाट्यावर- राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपाला फटकारले आहे. भाजपा सरकारचे अपयश आर्थिक मंदीमुळे चव्हाट्यावर आले असल्याची टीका राष्ट्रवादीने केली आहे. ‘मेरा देश बदल रहा है’ अशी टिमकी भाजप सरकार सतत वाजवत असते. पण विकास दर घसरत असल्याने देश नक्की कुठे चाललाय हे नवे आव्हान देशापुढे असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. याबाबत आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर राष्ट्रवादीने पोस्ट केली आहे.

केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर (जीडीपी) ५ टक्क्यांवर घसरला आहे. हाच दर गेल्या वर्षी ५.८ टक्के होता. सहा वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे देखील राष्ट्रवादीने म्हटले आहे.

मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातील घसरण तर हृदयाचे ठोके वाढवणारी आहे. गेल्या तिमाहीत या क्षेत्राचा विकासदर १२.१ टक्के होता. आता तो चक्क ०.६ टक्क्यांवर आपटला आहे. याशिवाय बांधकाम, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण, पर्यटन, वस्त्रनिर्मिती या क्षेत्रातही मोठी घसरण झाल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here