उत्कृष्ट मौर्य यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; प्रियांका गांधी यांनी केले स्वागत

Lok Sabha Election 2024 | स्वामी प्रसाद मौर्य यांचे पुत्र उत्कर्ष मौर्य यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सपाचे प्रभावी आमदार मनोज पांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्कर्ष मौर्य यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर प्रियांका गांधी यांनी त्यांचे स्वागत केले.
उत्कृष्ट मौर्य उर्फ अशोक मौर्य यांनी उंचाहर विधानसभा मतदारसंघातून मनोज पांडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मनोज पांडे यांना कोंडीत पकडण्याची काँग्रेसची रणनीती म्हणून याकडे पाहिले जात आहे. मौर्य यांची मते काँग्रेसकडे वळवण्याची तयारी सुरू आहे.
वास्तविक, सपा आमदार मनोज पांडे यांनी शुक्रवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसचे नुकसान होईल, अशी अटकळ बांधली जात होती. काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक रिंगणात आहेत. अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या विजयासाठी प्रियांका गांधी स्वत: तळ ठोकून आहेत. येथील सभांमधून भाजपवर निशाणा साधला जात आहे.
रायबरेली आणि अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. गांधी घराण्याशी जवळीक असलेले आणि गेली अनेक दशके तिथे कार्यरत असलेल्या किशोरीलाल शर्मा अमेठी मतदारसंघातून उमेदवार आहेत. राहुल गांधी यांनी शुक्रवारी त्यांचा प्रचारही केला आणि जाहीर सभेला संबोधित केले होते.
उत्कृष्ट आता काँग्रेसच्या राजकारणात उतरणार
अनेक दिवसांपासून राजकारणात स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले उत्कृष्ट आता काँग्रेसच्या राजकारणात उतरणार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य अनेक दिवसांपासून आपल्या मुलाला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपल्या मुलाला यूपीच्या उंचाहार विधानसभा मतदारसंघातून बसपाकडून दोनदा निवडणूक लढवायला लावली पण दोन्ही वेळा उत्कृष्ट मौर्य यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.





