Xi Jinping: “तैवानला चीनमध्ये विलीन करूनच शांत बसणार” ; शी जिनपिंग यांची पुन्हा एकदा कठोर भूमिका
Xi Jinping:

Xi Jinping: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानबाबत आपली कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीसी) १०५ व्या स्थापना दिनाच्या सोहळ्यात शी जिनपिंग यांनी सांगितले की, तैवानचा प्रश्न सोडवणे, म्हणजेच तैवानला चीनमध्ये विलीन करणे, हे पक्षाचे ऐतिहासिक ध्येय आहे. त्यांनी यावेळी बोलताना,”ही कम्युनिस्ट पक्षाची अतूट वचनबद्धता आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केली जाईल” असे म्हटले आहे.
आपल्या भाषणात, शी जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी गटांना कडक इशारा दिला. त्यांनी याविषयी बोलताना,”चीन अशा सर्व घटकांविरुद्ध निर्णायक कारवाई करेल आणि कोणताही बाह्य हस्तक्षेप सहन करणार नाही” असे म्हणत त्यांनी एक प्रकारे इशारा दिला.
तसेच त्यांनी तैवानचा प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाची रणनीती नवीन परिस्थितीत पूर्णपणे अंमलात आणली जाईल” असेही आश्वासन यावेळी दिले. शी जिनपिंग यांनी,”चीन राष्ट्रीय सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासात्मक हितसंबंधांचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करेल. त्यांनी पुनरुच्चार केला की राष्ट्रीय एकीकरणाचे ध्येय कोणत्याही परिस्थितीत साध्य केले जाईल आणि चीन या दिशेने पावले उचलत राहील” असे सांगितले. (Xi Jinping)
एका सशक्त देशासाठी सशक्त सैन्य आवश्यक: (Xi Jinping)
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी सैन्य अधिक मजबूत करण्याच्या गरजेवरही भर दिला. तसेच चिनी राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, एका सशक्त देशासाठी सशक्त सैन्य आवश्यक आहे आणि केवळ एक शक्तिशाली लष्करी शक्तीच राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करू शकते. त्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा तैवान सामुद्रधुनीमध्ये चीनच्या लष्करी हालचाली सातत्याने वाढत आहेत.
चीनच्या आर्थिक विकासाविषयी शी जिनपिंग काय म्हणाले? (Xi Jinping)
शी जिनपिंग यांनी हे देखील मान्य केले की, चीन सध्या अशा काळातून जात आहे, जिथे संधींसोबतच धोके आणि आव्हानेही आहेत. त्यांनी सांगितले की, शत्रू कितीही शक्तिशाली असो, मार्ग कितीही कठीण असो किंवा आव्हाने कितीही गंभीर असोत, चीन माघार घेणार नाही.” असा दावा देखील त्यांनी केला.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पक्षनेत्यांना संकटाची जाणीव अधिक दृढ करण्याचे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीत अधिक चांगला समन्वय साधण्याचे आणि उच्च-गुणवत्तेच्या विकासाला चालना देण्याचे आवाहन केले. त्यांनी पक्षांतर्गत भ्रष्टाचार आणि बेशिस्तीविरोधातही कठोर भूमिका घेतली आणि सांगितले की, पक्षाची पवित्रता आणि सामर्थ्य कमी करणारा कोणताही घटक काढून टाकला जाईल.






