मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगारातील काही रक्कम जमा झाली होती. त्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांनीही राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. मात्र आता महायुती सरकारकडून १२० कोटींचा निधी एसटी महामंडळाला वर्ग झाल्याने सर्व कर्मचाऱ्यांचा रोखून धरलेला उर्वरित ४४ टक्के पगार एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून पुरेसे अनुदान उपलब्ध होऊ न शकल्याने कर्मचाऱ्यांना फक्त ५६ टक्के पगार देण्याची नामुष्की एसटी महामंडळावर ओढवली होती. एसटी महामंडळाने ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासनाकडे ९२५ कोटी मागितले असताना वित्त आणि नियोजन विभागाने प्रत्यक्षात २७२ कोटी ९६ लाख रुपये निधी दिला. यापैकी ४० कोटींची रक्कम कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड म्हणून एसटी बँकेत भरावी लागली. वेतनासाठी ३६० कोटी रुपये लागतात. त्यामुळे महामंडळाने अप्रेंटिस वेतन १०० टक्के, निवृत्त अधिकारी वेतन फरक १०० टक्के, तर नियमित कर्मचाऱ्यांच्या नक्त वेतनाच्या ५६ टक्के रक्कम आणि सुरक्षा रक्षकांचे ५० टक्के असे पगार जमा केले. अर्धवट पगारामुळे विर-धिकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली. अखेर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी वित्त आणि नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हस्तक्षेप करीत उर्वरित पगार १५ एप्रिल रोजी होईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार राहिलेला पगार जमा करण्यात आला आहे. ७ तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार? एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल, याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल, असं आश्वासन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले. एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. तसेच राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन. परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही, याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन मंत्री त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.