Satara | आसले गावठाणावरील अतिक्रमण हटवावे

वाई, (प्रतिनिधी) – आसले (ता. वाई) येथील गावठाणावर झालेले अतिक्रमण हटवून, गावठाण अबाधित ठेवण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीच्यावतीने प्रांताधिकार्यांना नुकतेच देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, आसले येथील गट क्र. 300 गावठाण म्हणून शासणाने राखून ठेवला आहे. गट क्र. 300 अ येथील जागा बेघर वस्ती, तांडा वस्ती, वडार वस्ती, धनगर वस्ती, मांतग वस्ती, दलीत वस्ती इत्यादी बारा बलुतेदारांना वाटप करून देण्यात आली आहे.
या ठिकाणी बलुतेदारांचे 40 ते 50 वर्षांपासून वास्तव्य आहे. आसले हे कृष्णा नदीकाठी आहे. नदीच्या पूररेषेखालील यादीतील बाधित लाभार्थ्यांची यादी 1980 सालापूर्वी तयार करण्यात आली होती. आसले येथील गट क्र. 300 ब मधील क्षेत्र 2.34.50 हे. आर पूररेषेखलील बाधित लाभार्थ्यांसाठी राखून ठेवण्यात आले आहे; परंतु शासनाने या खंडाचा ताबा दिला नव्हता.
मात्र, काही तथाकथित गावपुढार्यांनी पाच ते दहा गुंठ्यांच्या भूखंडांवर दि. 2 व दि. 5 ऑगस्ट रोजी अतिक्रमण केले आहे. शासनाकडून आदेश आला आहे, असा चुकीचा संदेश देऊन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. या क्षेत्रावरील अतिक्रमणे काढून, गावठाण अबाधित ठेवण्यात यावे. 1980 पूर्वी प्रत्यक्ष पूररेषेखालील लोकांच्या नावाच्या यादीची पडताळणी करून, त्यांना भूखंडांचे वाटप करण्यात यावे.





