जांबूत : दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे घोडनदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे पिंपरखेड-देवगाव यांना जोडणारा कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पाण्याखाली गेला. तब्बल ४५ हजार क्युसेक्स पाण्याचा लोंढा नदीपात्रात सोडल्याने नदीने रौद्ररूप धारण केले. यामुळे बंधाऱ्याचे लोखंडी संरक्षण कठडे तुटले आणि काही वाहून गेले. यामुळे बंधाऱ्याची अवस्था धोकादायक बनली असून, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. पाण्याचा जोर कमी झाल्यावर बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अडकलेली जलपर्णी, झाडांचे अवशेष आणि कचरा यामुळे पायी प्रवास करणेही कठीण झाले होते. यामुळे पिंपरखेड-देवगाव मार्गावरील वाहतूक दोन दिवस बंद राहिली. मात्र, देवगाव येथील ग्रामस्थ संजय खांडगे, गोविंद खांडगे, दत्तात्रय दाभाडे, सुधाकर खांडगे, संतोष खळे, श्रीकांत दळवी, स्वप्निल पवार आणि यश गावडे यांनी दोन तास परिश्रम करून बंधाऱ्यावरील जलपर्णी हटवली आणि वाहतूक पुन्हा सुरळीत केली. हा बंधारा शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी पिंपरखेड येथे जाण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. बंधाऱ्याच्या धोकादायक अवस्थेमुळे जीवघेणा धोका उद्भवू शकतो, याकडे सरपंच दिपाली खांडगे, उपसरपंच दिलीप दाभाडे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप बोंबे, माजी सैनिक बळवंत बोंबे, पांडुरंग बोंबे, संदिप बोंबे पाटील, बाबाजी वरे, मंगेश बोंबे, अक्षय बोंबे, बाबाजी बोंबे आणि प्रथमेश बोंबे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तातडीने बंधाऱ्याची डागडुजी करून संरक्षण कठडे बसवण्याची मागणी केली आहे.