Leopard News: दोनदा चकवा, अखेर जाळ्यात! अखेर वनविभागाने ‘असा’ पकडला बिबट्या

प्रभात वृत्तसेवा
जांबूत – शिरूर तालुक्याच्या बेट भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीनंतर वनविभागाने कारवाईचा वेग वाढवला आहे. याचाच भाग म्हणून, गुरूवारी (दि. ४) पहाटेच्या सुमारास पिंपरखेड (ता. शिरूर) येथील आंबेवाडी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील पाच वर्षीय बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
मागील आठवड्यात या बिबट्याने काही ठिकाणी पशुधनावर हल्ले केले होते आणि दोन वेळा पिंजऱ्याला हूल देऊन भक्ष फस्त केले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बिबट्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी माणिकडोह (जुन्नर) येथील बिबट निवारा केंद्रात करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे. मागील दोन महिन्यांत पिंपरखेड, जांबूत, फाकटे या गावांतून सुमारे २० बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर अधिक आहे,
त्या ठिकाणी जुन्नरचे उपवनसंरक्षक प्रशांत खाते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाकडून पिंजरे लावण्यात येत आहेत. सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या सूचनेवरून वनपरिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे, वनरक्षक लहू केसकर, महेंद्र दाते आदी ही कार्यवाही करत आहेत.





